यंदाच्या गळीत हंगामात अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत
उसाचे गाळप वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचे
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून निर्देश
विलास कारखाना संचालक मंडळाची बैठक संपन्न
लातूर प्रतिनिधी : मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ :
यंदाच्या गळीत हंगामात अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत आहे, अडचणीतील शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत आणि कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले असून साखर कारखान्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी यांत्रिकीकरणातून १० हजार तरुणांना रोजगार मिळत असल्याचेही स्पष्ट केले.
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. त्यानंतर लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १५ हार्वेस्टर व ३० इनफिल्डर खरेदी करण्यात आले आहेत, त्याचे पूजन चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी व्हाईस चेअरमन, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, संचालक सर्वश्री रविंद्र काळे, अमृत जाधव, सतिष शिंदे (पाटील), अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, तात्यासाहेब पालकर, हणमंत पवार, नेताजी साळुंके (देशमुख), रामराव साळुंके, दिपक बनसोडे, लताबाई देशमुख, शाम बरुरे, सुभाष माने, माजी संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, भैरवनाथ सवासे, राजेंद्र मस्के, रामचंद्र सुडे, उमेश बेद्रे, चंद्रकांत टेकाळे, जयचंद भिसे, अनिल पाटील, नारायण पाटील, भारत आदमाने, बाळासाहेब बिडवे, आदीसह कारखान्याच्या संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक, सभासद उपस्थित होते.
गाळप नियोजनाच्या केल्या सूचना
यावेळी बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, यावर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेऊन, त्यांच्या उसाच्या गाळपाचे नियोजन करावे, या नियोजनाप्रमाणे ऊस तोडीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यात यावे, अधिकाधिक कार्यक्षमतेने कारखाना चालवून जास्तीत जास्त उसाचे गाळप करावे, अशा सूचना याप्रसंगी दिल्या आहेत.
यांत्रिकीकरणातून रोजगार निर्मिती
पूढे बोलतांना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत व्हावे यासाठी मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखान्यांच्या वतीने ऊस तोडणीचे ही यांत्रिकीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे, या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या १० हजार मुलांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे याप्रसंगी बोलताना सांगीतले. यावेळी लवकरच सुरू होत असलेल्या गळीत हंगाम पूर्वतयारीचा या बैठकीदरम्यान त्यांनी आढावा घेतला.
----
Tags:
LATUR
