मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूरमध्ये विजय संकल्प सभा ;महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने टाऊन हॉल येथे धडाडणार तोफ
लातूर/प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवार दि. ७ जानेवारी रोजी लातूर येथे येत आहेत. सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील मैदानावर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक प्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर, डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर व शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाºया या विजय संकल्प सभेस जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर, आ. रमेश कराड, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ. अभिमन्यू पवार, माजी खा. सुनिल गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
लातूर शहर महानगरपालिका निवडणूक भाजपा पूर्ण ताकदीने लढत आहे. सर्व ७० जागांवर भाजपाने उमेदवार उभे केले आहेत. विकासाच्या मुद्यावर उमेदवार मतदारांना सामोरे जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना लातूरमधील नागरिकांना लाभदायक ठरलेल्या आहेत. या अनुषंगाने लातूरमध्ये भाजपाला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे.
या निवडणुकीत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रचाराच्या निमित्ताने येवून गेले आहेत. आता स्वत: मुख्यमंत्री सभा घेणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानात होणाºया या सभेत लातूरच्या विकासाचा रोडमॅप मुख्यमंत्री सादर करणार आहेत. राज्य सरकारने आजपर्यंत लातूरसाठी राबविलेल्या योजना आणि भविष्यात विकासासंदर्भातील नियोजन त्यांच्याच मुखातून ऐकण्याची संधी यानिमित्ताने लातूरकरांना लाभणार आहे.
लातूर मनपा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक आणि मतदारांनी यासभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूकप्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर, डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर व शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले आहे.
Tags:
LATUR
