बंडखोरांचे भाजपामधून 6 वर्षांसाठी निलंबन - अजित पाटील कव्हेकर यांची माहिती
लातूर/ प्रतिनिधी: पक्षशिस्तीचा भंग करून संघटनात्मक शिस्तीला बाधा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने पक्षातील 18 जणांना भाजपातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी दिली.
लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षशिस्त, धोरणे व निर्णय यांचे पालन होणे अपेक्षित होते.तथापि काहीजणांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाच्या शिस्तीला बाधा निर्माण झाली.या संदर्भात पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर या 18 जणांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कार्यकर्ते जी पदे भूषवित होते ती पदेही समाप्त केली जात असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.
पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या 18 जणांमध्ये संगीत रंदाळे, गणेश हेड्डा, वल्लभ वावरे, श्रीनिवास लांडगे, पृथ्वीसिंह बायस, शिवसिंह शिसोदिया,विवेक साळुंके,श्रीकांत रांजणकर,वैभव वनारसे,विशाल हवा पाटील,अजय कोकाटे,किशोर कवडे,संदीप सोनवणे,अशोक ताकतोडे, दिलीप बेलूरकर,दीपक कांबळे,महेश झंवर,भरत भोसले यांचा समावेश आहे.
पक्षहित व संघटनात्मक शिस्त लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचेही शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी या पत्रात म्हटले आहे.
Tags:
LATUR
