लातूरकरांच्या भावनांवर हल्ला; भाजपच्या विलासराव देशमुखांबद्दलच्या वक्तव्याने शहरात संतापाची लाट
*प्रतिनिधी । लातूर*
भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरच्या लोकभावनांचं प्रतीक असलेल्या विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे लातूर मध्ये तीव्र संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या एका प्रचार सभे मध्ये केल्या गेलेल्या या वक्तव्याने केवळ एका नेत्याचा अपमान झालेला नसून, लातूरच्या सांस्कृतिक परंपरेवर आणि लोकांच्या भावना-संस्कारांवर थेट आघात झाल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
लातूर हे केवळ एक शहर नाही, तर संस्कार, सभ्यता आणि लोकनेतृत्वाची परंपरा जपणारा मुलुख आहे. या परंपरेचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे विलासराव देशमुख. त्यांच्या विचारांनी, कार्याने आणि सामान्य माणसाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याने लातूरकरांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केलं आहे. म्हणूनच विलासराव देशमुख हे लातूरसाठी केवळ नाव नाही, तर जिवंत भावना आहेत.
“येणाऱ्या महापालिकेत विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून निघतील,” असे संकेत देणारे विधान लातूरकरांसाठी अत्यंत वेदनादायक ठरले आहे. विलासराव देशमुखांनी लातूरला शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि आधुनिक विकासाची ओळख दिली. त्यांच्या कार्याची पुसट आठवणही पुसण्याचा विचार म्हणजे लातूरच्या इतिहासाशी बेईमानी असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
या वक्तव्यानंतर लातूरकरांसाठी ही निवडणूक आता केवळ सत्तेची लढाई राहिलेली नाही. ही लढाई आता लातूरच्या स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची आणि संस्कृतीच्या रक्षणाची बनली आहे. विलासराव देशमुखांचा अपमान म्हणजे लातूरचा अपमान मानला जात असून, या मुद्द्यावर नागरिकांमध्ये अभूतपूर्व एकजूट आणि भावना दिसून येत आहेत.
Tags:
LATUR
