लातूरमध्ये “दिवाळी संध्या”; राहुल देशपांडे यांच्या सुरांनी उजळली पाडव्याची रात्र
लातूर, दि. २३ :
दिवाळी पाडव्याच्या शुभसंध्येला लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुरेल स्वरांचा सोहळा रंगला. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने लातूरकरांची दिवाळी अधिक सुरमय आणि आनंदी झाली.
या “दिवाळी संध्या” कार्यक्रमाचे आयोजन विलास बँक यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, वैशाली देशमुख,आदिती देशमुख आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला प्रतिष्ठेची झळाळी लाभली.
राहुल देशपांडे यांनी शास्त्रीय संगीत, भावगीत आणि गझलांच्या स्वरांनी श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या स्वरांमधून पसरलेले रसिकतेचे सुवासिक वातावरण आंबेडकर उद्यानात दरवळत राहिले.
दिवाळीच्या या सांगीतिक संध्येला लातूरकरांची प्रचंड उपस्थिती लाभली. कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी उत्साहाने टाळ्यांच्या गजरात प्रत्येक सुरेल प्रस्तुतीचा आस्वाद घेतला.
संस्कृती आणि उत्सवाचा संगम घडवणाऱ्या “दिवाळी संध्या”ने लातूरकरांच्या दीपोत्सवात आनंदाचे आणि अभिमानाचे नवे सूर फुलवले.
Tags:
LATUR









