आपल्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करणार : डॉ. विश्वास कुलकर्णी
लातूर : आपल्या रुग्णालयात किडनी स्टोनच्या कारणावरून दाखल झालेल्या रुग्णाने व त्याच्या निकटवर्तीयांनी आपल्यावर शुक्रवारी लातुरात जे खोटे आरोप केले आहेत, त्यांच्यावर आपण अबू नुकसानीचा तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लातूरचे ख्यातनाम मूत्र विकार तज्ज्ञ डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी शुक्रवारी ( दि. ८ ऑगस्ट ) सायंकाळी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
लातुरातील एका प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिकांवर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांचे खंडन करण्याच्या उद्देशाने लातूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. विश्वास कुलकर्णी बोलत होते. आपण ही पत्रकार परिषद आपल्यावर खोटे आरोप केल्याच्या कारणावरून घेत नसून आपली या संदर्भातील वास्तव भूमिका प्रसार माध्यमांच्या समोर विशद करण्यासाठी घेत असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. या प्रकरणात आपल्यावर आरोप केलेल्या रुग्णावर आपल्याच रुग्णालयात किडनी स्टोन ची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सदर रुग्णाच्या किडनीच्या ५ सेंमी . आकाराचा खडा निघाला होता. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाच्या सर्व आवश्यक त्या चाचण्या व तपासण्याही करण्यात आल्या होत्या. त्याचे सगळे रिपोर्टस उपलब्ध आहेत. किडनीतील खडा मोठा असल्यामुळे त्याच्या किडनीची कार्यक्षमता तपासण्यासाठी आम्ही युएसजी व आयव्हीपी तपासण्या केल्या असता किडनी खराब असल्याचे निदर्शनास आले. ही बाब रुग्ण व त्याच्या नातेवाईकांच्या कानावर घालण्यात आली. त्यांच्या संमतीने किडनी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही रुग्णाच्या शरीरातील एखादा अवयव काढायचा असेल तर रुग्ण, त्याच्या नातेवाईकांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. या रुग्णाची तसेच त्याच्या नातेवाईकांची इंग्रजी व मराठी भाषेत रीतसर पूर्वपरवानगी घेतली गेली. त्यावर रुग्ण व त्याच्या कुटुंबियांच्या सह्याही आहेत. आज संबंधित रुग्णाची प्रकृती ठणठणीत आहे. रुग्ण व त्याच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणी आपल्याकडून पैसे लाटण्याच्या अनुषंगाने हा प्रकार केला असल्याचा स्पष्ट आरोपही डॉ. कुलकर्णी यांनी केला.
शस्त्रक्रियेनंतर काही मंडळींच्या सांगण्यावरून सदरील रुग्ण व त्याच्या निकटवर्तीयांकडून आपल्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याचाही प्रकार झाला. पोलिसांनी त्या रुग्णावर करण्यात आलेल्या उपचार व शस्त्रक्रियेसंदर्भातील सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर ही केस बंद करून टाकली होती. या प्रकरणी आपण लवकरच संबंधितांवर अब्रुनुकसानीचा व खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी सांगितले.
लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम यांनी यावेळी बोलताना एखाद्या रुग्णाची त्याच्या नातेवाईकांपेक्षाही अधिक काळजी घेण्याचे काम त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेत असतात. अशावेळी रुग्ण किंवा त्याच्या निकटवर्तीयांकडून अशा प्रकारचा खोटा आरोप केला जात असेल तर डॉक्टरांनी रुग्णांची सेवा शुश्रूषा करायची तरी कशी ? अशा भावना व्यक्त केल्या. डॉ. विठ्ठल लहाने यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले. यावेळी डॉ. हमीद चौधरी, डॉ.अशोक पोद्दार, डॉ. अजय जाधव, डॉ. ऋषिकेश हरिदास , डॉ. संजय पौळ , डॉ. कल्याण बरमदे, डॉ. ज्योती सूळ, डॉ. चपळगावकर, डॉ. राजकुमार दाताळ , डॉ. विश्रांत भारती, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. रचना जाजू यांच्यासह आयएमएचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
LATUR