लातूर हादरले! चाकूरमध्ये बार मालकाची निर्घृण हत्या; गल्ल्यातील रोकड लंपास
लातूर (विशेष प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याचा दावा वारंवार केला जात असला तरी, वास्तव मात्र वेगळेच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बार मालकाचा निर्घृण खून करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गजानन नामदेव कसले असे मयत बार मालकाचे नाव असून, चोरट्यांनी त्यांची हत्या करून गल्ल्यातील रोकड पळवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, चाकूर तालुक्यातील नायगाव नजीक 'बी. एन. बार अँड रेस्टॉरंट' (B.N. Bar & Restaurant) आहे. या बारचे मालक गजानन नामदेव कसले हे नेहमीप्रमाणे रात्री बारवर उपस्थित होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर लाकडी दांडक्याने जोरदार वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की त्यात गजानन कसले यांचा जागीच मृत्यू झाला.
हल्लेखोरांनी केवळ हत्याच केली नाही, तर बारच्या गल्ल्यात असलेली दिवसभराची जमा झालेली रोकडही लंपास केली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस तपास सुरू घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासावरून हा प्रकार लुटीच्या उद्देशाने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून, आरोपींचा कसून शोध सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर गजाआड करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांकडून आणि ग्रामस्थांकडून होत आहे.
Tags:
LATUR
