विकास हाच भाजपचा अजेंडा,काँग्रेस निवडणूक वेगळ्या दिशेला घेऊन जातेय - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
लातूर/प्रतिनिधी:विकासाची भूमिका घेऊन भाजपा लातूर महानगरपालिका निवडणुकीत जनतेला सामोरी जात आहे.याउलट काँग्रेसकडून जातीय विष पेरण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस ही निवडणुक वेगळ्या दिशेला घेऊन जात आहे,असे प्रतिपादन माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
पाटील प्लाझा येथील भाजपा निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आ.निलंगेकर बोलत होते. शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, गुरुनाथ मगे, प्रविण सावंत यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. निलंगेकर म्हणाले की,भाजपा विकासाची भूमिका घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. लातूर शहरातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम मागील काळात भाजपाने केले आहे. यापुढेही त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहरातील वाहतुकीच्या समस्येवर उत्तर शोधणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजन करावे लागते. वाहतुकीला शिस्त लावावी लागेल. परंतु त्यासाठी लातूरमध्ये रहायला हवे, असा टोलाही आ. निलंगेकर यांनी लगावला.
केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. लातूरमध्ये भाजपा सत्तेत आली तर विकासासाठी ट्रिपल इंजिन मिळेल.याचा फायदा लातूरकरांना होणार असल्याचेही आ.निलंगेकर म्हणाले.
काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका नीट मांडता येत नाही.सत्ताधारी म्हणून काम करता येत नाही. मागील 15 वर्ष जनतेने तुमचे म्हणणे ऐकले.साहेबांचा वारसा तुम्हाला दिला परंतु साहेबांना अभिप्रेत काम आपण केले का? असा सवालही आ.निलंगेकर यांनी अमित देशमुख यांचे नाव न घेता उपस्थित केला.
भाजपात जात-पात पाहून तिकिटांचे वाटप केले जात नाही. जो कार्यकर्ता जनतेची कामे करतो त्याला उमेदवारी मिळते. अशांनाच यावेळीही उमेदवारी मिळाली आहे. लातूर हे सुसंस्कृत शहर आहे.परंतु या शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय विष पेरण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. अशा पद्धतीने वातावरण बिघडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही आ. निलंगेकर यांनी दिला.
राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून भाजपा काम करतो.इतरांच्या चारित्र्यावर चिखलफेक करणे ही आमची संस्कृती नाही.ही निवडणूक लातूरची आहे त्यामुळे लातूरकरांच्या प्रश्नावरच बोलावे.निलंगेकर -
देशमुख अशी लढाई ही बाभळगाव पासून निलंग्यापर्यंत चालेल पण लातूरमध्ये चालणार नाही,असेही आ.निलंगेकर म्हणाले.
अजित पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातुन लातूर शहरात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांचा लातूर दौरा... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक प्रचारासाठी बुधवार दि. 7 जानेवारी रोजी लातूरला येत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सकाळी 11 वाजता त्यांची सभा होणार आहे.आज रविवारी रात्री महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे बैठका घेणार आहेत.सोमवारी सकाळी साळाई मंगल कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार असल्याची माहितीही आ. निलंगेकर यांनी दिली.
Tags:
LATUR
