Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

विश्वनाथाच्या रूपाने ‘मानवतेची ज्योत’ प्रज्वलीत भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र सुनील शास्त्री यांचे विचार

विश्वनाथाच्या रूपाने ‘मानवतेची ज्योत’ प्रज्वलीत
भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र सुनील शास्त्री यांचे विचार
विश्वधर्मी रामेश्वर (रूई) येथे ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवना’चे लोकार्पण




लातूर, १४ नोव्हेंबरः " जगाला एका सूत्रात ठेवायचे असेल तर मानवता आवश्यक आहे. मानवते शिवाय कोणताही देश जीवंत राहू शकत नाही. देशाच्या उन्नतीसाठी मानवता आणि व्यक्तीचे शुद्ध आचरण अत्यंत महत्वाचे आहे. आज रामेश्वर (रूई) येथे विश्वनाथाच्या रुपाने मानवतेची ज्योत पेटविण्यात आली आहे. जी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे.” असे विचार भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र व माजी खासदार सुनील शास्त्री यांनी व्यक्त केले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारत व मानवता तीर्थ रामेश्वर (रूई) यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या ‘विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनाचे’ लोकर्पण लातूर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रूई) या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सत्य, शांती, अहिंसा, प्रेम आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या, मानवी इतिहासातील काही उत्तुंग व पथदर्शी व्यक्तिमत्वांच्या चैतन्यदायी प्रतिकांची या ठिकाणी प्रतिष्ठापना, पूजन आणि कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मानवतेची ज्योत प्रज्वलित ठेवणारे डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा विशेष सत्कार जपान येथून आलेले इसो कोईतोमियो व पेजावर मठाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व रामविलास वेदांती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संत वृत्तीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर होते. तसेच या वास्तूचे संकल्पक, संरचना, नियोजक व निर्मितीकार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे उपस्थित होते.
तसेच आमदार रमेश कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राहुल वि. कराड, अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीचे विश्वस्त हभप तुळशीराम दा. कराड, प्रगतिशील शेतकरी हभप काशीराम दा. कराड, रामेश्वर (रूई) चे सरपंच सचिन कराड व राजेश कराड उपस्थित होते.
सुनील शास्त्री म्हणाले," भारतरत्न लाल बहाद्दू शास्त्री यांनी दिलेल्या जय जवान, जय किसन या संदेशाच्या पुढे वर्तमानकाळात जय इंसान जोडणे गरजेचे आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी मानवतेचे स्वप्न मला दाखविले होते परंतू प्रत्यक्षात डॉ. कराड यांनी ते साकार केले आहे.”
डॉ.विजय भटकर म्हणाले," मानवतेचा संदेश मांडणारे डॉ. विश्वनाथ कराड हे विश्वासमोर एक आदर्श आहेत. यातूनच समाजात एक उच्च संस्कृती उदयास येईल. या विचारातूनच एक आदर्श समाज निर्माण होईल. तसेच समरसतेचा संदेश खेड्या खेड्यातून जगापुढे जाणे गरजेचे आहे.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले," संपूर्ण जगाला विश्वशांती आणि विश्व कल्याणाचा संदेश विश्वधर्मी मानवता तीर्थ भवनातून जाईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत देशाचे खरे रुप रामेश्वर येथे दिसून येते आहे. हा मानवता भवनच संपूर्ण जगाची दिशा दर्शविणारा आहे. येथून भारतीय चिंतन, परंपरेचा संदेश विश्वात पोहोचणार असून सर्वांनी त्याचे अनुकरण करावे. भगवान गौतम बुद्धांचे पंचशील आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचे पसायदान हे मानव उध्दारासाठी आहे.”
डॉ. राहुल दा. कराड म्हणाले," संस्थेच्या माध्यमातून डॉ. कराड यांनी माइलस्टोन कार्य केले आहे. विश्व शांती हेच या संस्थेचे लक्ष्य असून त्या आधारेच मानवता तीर्थ भवनाची निर्मिती झाली. या भवनातूनच संपूर्ण जगात लोकशाही बळकट करणे, अध्यात्म आणि खिलाडूवृत्ती रूजविण या तीन गोष्टीं साकार होतील.”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले," विश्वात सुरू झालेल्या संघर्षाच्या वातावरणात मानव भयभीत झाला आहे. अशा वेळेस मानवधर्मा संदर्भात विचार करतांना एकात्मता, विज्ञान आणि अध्यात्माचा सारांश, संतांचे संतत्व आणि धर्माची पुण्याई या सर्वांचा मेळ म्हणजेच मानवता येथे दिसून येते आहे. सर्व धर्मांचा गाभा हा मानवतेचा आहे. येथूनच सात्विकतेचा आणि अहिंसेचा विचार विश्वाला तारणारा आहे. या वास्तूत मानवधर्माचे तीर्थ क्षेत्र दिसून येत आहे. येथे धार्मिकतेची देवाण घेवाण घडतांना दिसत आहे.”
डॉ. राम विलास वेदांती म्हणाले," विश्वाला शांती आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी डॉ कराड यांचे मानवतेचे विचार महत्वाचे आहे. सामाजिक सदभावसाठी राष्ट्रीय एकतेचे सर्वात मोठे कार्य केले आहे. डॉ. कराड यांनी बनविलेले विश्वधर्मी मानवता भवनात सर्व जाती, धर्मांचे लोक विराजमान आहेत. रामेश्वर येथे सामाजिक एकतेचे दृष्य पहावयास मिळणे हे दुर्लभ क्षण आहेत.”
यावेळी फादर फेलिक्स मच्याडो, राहुल भन्ते बोधी, एडिसन सामराज, डॉ. मेहर मास्टर मूस, इझिकेल मळेकर, सरदार सुरजीत सिंह खालसा, डॉ. फिरोज बख्त अहमद, डॉ. लेसन आझादी, योगी अमरनाथ, मौलाना अन्सारी चतुर्वेदी, महंत रामदास, बि.के. बिन्नी सरीन, कमलाताई गवई, पुष्पा बोंडे, मायकेल गनेल, इंद्रजीत भालेराव या सर्वांनी डॉ. कराड यांच्या विश्वशांती कार्याला हातभार लावण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या कार्याला पाहुन भारत सरकार कडून भारतरत्न देण्याची मागणी केली. ते सर्व गुण संपन्न आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उत्तुंग कार्य पाहता त्यांना नोबल पुरस्काराने गौरवान्वित करण्यात यावे.
तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉ. करण सिंग, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि अमेरिकेतून डॉ. अशोक जोशी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला.
यावेळी लेखक लक्ष्मण घुगे लिखित विश्वशांतीची महागाथा या कादंबरीचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. तसेच वास्तू रचनाकार विभीषण शेप यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. मिलिंद पात्रे यांनी ओमकार ध्यान साधना केली. डॉ. मंगेश तु. कराड यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. गौतम बापट व प्रा.अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे
 3 Attachments
  • Scanned by Gmail

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post