पेठ शिवारात धक्कादायक घटना: दोघांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत!
लातूर:-
मृतदेह आंबेजोगाई तालुक्यातील दरडवाडी येथील रहिवासी; एक महिला एमआयटी मेडिकल कॉलेजमध्ये नर्स
सणासुदीच्या काळात लातूर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पेठ शिवारात दोन इसमांचे मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेले दोन्ही व्यक्ती हे आंबेजोगाई तालुक्यातील दरडवाडी येथील रहिवासी असल्याचे समजते. या दोघांपैकी मृत झालेली महिला ही एमआयटी मेडिकल कॉलेजमध्ये नर्स म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात तात्काळ हालचाल सुरू झाली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अंगुली मुद्रा (फिंगरप्रिंट) टीमलाही पाचारण करण्यात आले असून, ती टीम घटनास्थळी तपास करत आहे.
हे मृत्यू आत्महत्या आहेत की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील तपास सुरू...
Tags:
LATUR
