जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ सरसकट मदत द्यावी
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लातूर/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत आहे. गेल्या पंधरा दिवसात तर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. या कारणाने जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेती पिकासह जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरा असलेला सोयाबीनचे १०० टक्के नुकसान झालेले असून खरीपाचा हंगाम हातातून गेला आहे. रब्बीची पेरणीही होईल की नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करत तत्काळ सरसकट मदत करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात जुलै महिना अखेरपासून सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सतत पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांत तर जिल्ह्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून आगामी काही दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे. या परिस्थितीने जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेती पीकासह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेकांच्या शेतातील माती वाहून गेल्या असून जमिनीही खरडल्या गेल्या आहेत. जिल्हयात खरीप हंगामात सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीनचे पीक शंभर टक्केहातातून गेलेले आहे.त्याच बरोबर खरीप हंगामातील इतर पिकांचेही मोठे नुकसान होवून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरांचे नुकसान झालेले आहे. जिवित हानी होवून पशुधनही दगावले गेले आहेत. या परिस्थिती शेतकरी व सर्वसामान्य नागरीक हवालदिल झालेला असून जिल्हा जलमय झालेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
शासकीय यंत्रणेने जे पंचनामे केले आहेत. ते ग्राह्य धरून सरसकट मदत मिळावी, अशीही मागणी आपण केली असून ओल्या दुष्काळांतर्गत येणारी सर्व मदत जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना तत्काळ मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलीआहे. या सर्व परिस्थितीत शेतकºयांनी हताश होवू नये, असे आवाहन करून बळीराजाच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिली आहे.
Tags:
LATUR