माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली सभा
पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या 'संतवाणी' कार्यक्रमाचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी) मंगळवार दि. १३ ऑगस्ट २५ :
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बाभळगाव येथील विलास बागेत सार्वजनिक आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांचा भक्ती संगीत आणि 'संतवाणी'चा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे लोकनेते विलासराव देशमुख यांचे नेतृत्व आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सरपंचपदापासून ते राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात, विकासाचे आणि लोककल्याणाचे ध्येय जपले. त्यांच्या दिलखुलास स्वभावाने त्यांनी विरोधकांनाही आपलेसे केले. आजच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत, निष्ठा आणि मूल्याधारित राजकारणाची त्यांची शिकवण अधिकच महत्त्वाची ठरते. त्यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
अशा लोकनेत्याला आंदराजली अर्पन करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या सभेत पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाच्या संतवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्याज आले आहे.
या सभेसाठी सकाळी ८.५० वाजता विलासबाग येथे सर्वांनी स्थानापन्न व्हावे अशी अपेक्षा आहे. सकाळी ९.०० वाजता पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाचा संतवाणी कार्यक्रम सादर करण्यात येईल. जयपूर-अत्रौली घराण्याचे पंडित रघुनंदन पणशीकर हे प्रख्यात शास्त्रीय गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या बहुआयामी प्रतिभेमुळे त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यांनी भारतच नव्हे, तर युरोप, अमेरिका आणि आखाती देशांमध्येही आपल्या गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
यानंतर सकाळी ९.४५ वाजता शेवटचे भजन होईल, भजन संपल्या नंतर सकाळी ९.५५ पासून पुष्पअर्पण करुन आदरांजली वाहण्यात येईल. आदरांजली वाहील्यानंतर सकाळी १०.०० वाजता प्रार्थना सभेचा समारोप होईल.
या प्रार्थना सभेचे सुत्रसंचालन बाळकृष्ण धायगूडे करणार आहेत. या आदरांजली सभेस विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून वेळेत उपस्थित राहावे, असे विनम्र आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags:
LATUR