पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित, समृध्द आणि सुरक्षित भारत निर्माण झाला
पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती
लातूर/प्रतिनिधी : २०१४ साली लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपाला बहुमत दिले होते. देशातील जनतेने दिलेल्या बहुमताचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याची ग्वाही देवून आपला कारभार सुरू केला होता. मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळास ११ वर्ष पूर्ण होत असून यादरम्यान केवळ भ्रष्टाचारमुक्तच नव्हे तर विकसित, समृध्द आणि सुरक्षित भारत निर्माण झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
लातूर येथील शासकीय विश्रागृहात आयोजित मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संकल्प से सिध्दी या विषयासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यासह भाजपा पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ११ वर्षाचा प्रवास १४० कोटी भारतीयांना सोबत घेवून पूर्ण केला असल्याचे सांगत आ. निलंगेकर म्हणाले की, या११ वर्षाच्या कामगिरीची माहिती एका भाषणात किंवा पत्रकार परिषदेत देणे शक्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वल भारताच्या भविष्याची पायाभरणी केलेली असून विकासाला गती दिलेली असून सबका साथ सबका विश्वास सबका विश्वास या संकल्पनेनुसार त्यांनी देशाचा कारभार केलेला आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी उद्योग विकासालाही मोठी चालना दिली आहे. जनतेने आपल्याला जो जनाधार दिलेला आहे.तो जनाधार सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी कायमच जनतेच्या हिताला आणि देशाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान मोदी सरकारच्या आधी भारताला भ्रष्टाचाराने पोखरून काढले होते. जनतेसाठी विविध योजना राबविल्या जात असल्या तरी याचा लाभ सामन्य जनतेपर्यंत पोहोचत नसे. त्याच बरोबर सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचाराच्या सुविधा उपलब्ध असुनही त्या परवडणाºया नव्हत्या. सर्वसामान्य जनतेचे आयुष्य सुखकर व्हावे याकरिता पंतप्रधान मोदी यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ देण्यासह आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले.
मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगाला चालना देवून अनेक वस्तुंची निर्यात करणारा देश म्हणून अवघ्या जगात भारताची ओळख निर्माण केली आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करून आज जगातील चौथी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपली वाटचाली सक्षमपणे सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनी स्वत: न घेता देशातील १४० कोटी जनतेला दिले आहे. दहशतवाचा बिनमोड करताना त्यांच्या देशात घुसून जशाच तशे उत्तर देण्याचे कामही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने करून जगातील बलशाली देश म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे भारतातच विविध शस्त्रे व क्षेपणास्त्रे निर्माण करून संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत आहेत. गरीबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या या ११ वर्षाच्या कार्यकाळात गरीब कल्याण अन्न योजना, उज्वला योजना, आवास योजना, जलजीवन मिशन, जनधन योजना, आयुष्यमान भारत, किसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबवून त्याचा लाभ सर्वसमान्य नागरिकांना देण्यात येत आहे. केवळ भारताला समृध्द करण्याचेच नव्हे तर भारताची संस्कृती जोपासण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. श्री राम मंदीर निर्मीती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर यासारखी अनेक उदाहरणे देता येतील. जम्मू-काश्मिरमध्ये असलेले ३७० कलम रद्द करून देशाची अखंडता अबाधित ठेवण्याचे काम पंतप्रधान मोदीेंनी केले आहे. या ११ वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी यांनी देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी जनतेला विश्वासात घेवून सामुहीक प्रयत्न करून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पना कृतीत आणून एक आदर्श स्थापित केला असल्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बस्वराज पाटील मुरुमकर तर आभार प्रदर्शन शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले. यावेळी ग्रामीण जिल्हा महामंत्री संजय दोरवे, प्रदेश सांस्कृतिक सेलचे अॅड. शैलेश गोजमगुंडे, प्रवक्ता प्रेरणा होनराव, माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, सुधीर धुत्तेकर, सरचिटणीस रवी सुडे, मीना भोसले, व्यंकटेश कुलकर्णी यांच्यासह ग्रामीण व शहराचे पदाधिकारी उपस्थित होते.