*लातूर जिल्हा रूग्णालयाची जागा अखेर आरोग्य विभागाच्या ताब्यात......*
मंजूर असूनही गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा रुग्णालयाचा प्रलंबित विषय आता प्रत्यक्षात मार्गी लागला असून कृषी महाविद्यालयाची १० एकर जमीन आज महसूल विभागाने आरोग्य विभागाच्या ताब्यात दिली आहे.
गेल्या १४ मे २०२५ रोजी जमिनीचा मोबदला म्हणून ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपयांचा निधी आरोग्य विभागाच्या वतीने कृषी विभागाच्या खात्यावर वर्ग केला होता. हा हस्तांतरण निधी राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केला होता. याकामी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष पाठपुरावा केला होता. आज २२ मे २०२५ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांनी कृषी महाविद्यालय, महाराणाप्रताप नगर येथील सर्वे नंबर ३७/१ मधील १० एकर जमिनीचा ताबा महसूल विभागाकडून घेतला. याप्रसंगी मंडळ अधिकारी सुनिल लाडके, तलाठी गोपाळ धुमाळ, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद कलमे, डॉ किरण गरड, कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर मोरे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ व्यंकट जगताप यांची उपस्थिती होती.
नियोजीत जिल्हा रूग्णालय इमारतीचे भूमिपजन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात यावे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, जिल्ह्यातील सर्व आमदार यांची उपस्थिती असावी अशी अपेक्षा जिल्हा रुग्णालयासाठी आग्रही असणाऱ्या आणि यासाठी निरंतर लढा देत शासन, प्रशासन स्तरावर पाठपुरावा करणाऱ्या माझं लातूर परिवाराने केली आहे.

