"जय हिंद" म्हणत मुलाचा वाढदिवस सोडून लातूरचा जवान सीमेवर रवाना*
लातूर : भारत -पाक दरम्यान वाढलेला तणाव पाहता भारतीय लष्कराने जवानांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक जवान ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी होण्यासाठी सीमेकडे परतत आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या जावळी या गावचा जवान कैलास तुकाराम सूर्यवंशी मुलाचा वाढदिवस सोडून काल संध्याकाळी बिकानेर सीमेवर कर्तव्यावर हजर राहण्यासाठी रवाना झाला.
लातूरचा कैलास हा २००४ मध्ये सीमा सुरक्षा दलात दाखल झाला. सध्या तो ४५ दिवसांच्या रजेवर आपल्या गावी आला होता. आज त्याच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता मात्र आपली सुट्टी रद्द झाली असून तात्काळ कर्तव्यावर हजर होण्याचे आदेश आल्याचा निरोप आला. क्षणाचाही विलंब न करता कैलास मुलाचा वाढदिवस सोडून रजेच्या ११ व्या दिवशी काल ९ मे २०२५ रोजी संध्याकाळी लातूर - मुंबई या रेल्वेने राजस्थान येथील बिकानेर सीमेवर हजर राहण्यासाठी रवाना झाला. याप्रसंगी कैलासचे वडील, नातेवाईक, गावकरी उपस्थित होते. कैलाससह त्याचे वडील सर्व नातेवाईक भाऊक झाल्याचे दिसून आले.