Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरच्या राजकारणाची दिशा आणि दशा ठरवणारी निवडणूक....

*लातूरच्या राजकारणाची दिशा आणि दशा ठरवणारी निवडणूक....





"आम्ही भारताचे लोक" या शब्दांनी भारतीय संविधानाची उद्देशिका (Preamble) सुरू होते. हे वाक्य आपल्या संविधानाचा आत्मा आहे. संविधानाचे अंतिम अधिकार आणि सार्वभौमत्व हे जनतेच्या हातात आहे, आणि लोकांनीच हे संविधान स्वतःसाठी स्वीकारले, बनवले आणि लागू केले आहे. निवडणुका या लोकशाहीचा उत्सव आहे. महापालिकेची ही निवडणूक लातूरच्या राजकारणाची दिशा आणि दशा ठरवणारी आहे. म्हणून या उत्सवात अमूल्य असे मतदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. चला तर सुजाण, सजग लातूरकरांनो लोकशाही बळकट करूया.

शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रगतशील आणि सुसंस्कृत शहर म्हणून संपूर्ण राज्यात ख्याती असलेल्या माझं लातूरने सभ्य, संस्कारक्षम राजकारणाचा आदर्श वारसा जपला आहे. 'Democracy is government by discussion.' जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताच्या म्हणण्यानुसार लोकशाही म्हणजे "संवाद" असलेले शासन. दुर्दैवाने आजघडीला सुसंवाद हरपत चालला आहे. माजला आहे तो कर्णकर्कश कलकलाट, बेताल, उबग आणणारी वक्तव्ये, राजकारण्यांचा ढळलेला तोल हे शांत, संयमी लातूरकरांना अस्वस्थ करणारा आहे. राजकारणाचा स्तर कधी नव्हे तो एवढा खालावलेला आहे. संधिसाधूपणा, पक्षबदलाची लाट, स्वार्थ, विचारधारेशी एकनिष्ठ नसणारे राजकीय नेते-कार्यकर्ते पहिले की लातूरचा सुसंस्कृतपणा लोप पावतो काय? अशी शंका निर्माण झाली आहे. 
समाजकारण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे राजकारण असते. मात्र राजकारणाकडे करिअर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आणि निवडणुका इव्हेंट म्हणून जर पार पडत असतील तर हे लोकशाहीला मारक ठरणार आहे. सत्तेतून सेवा ही संकल्पना जाऊन सत्तेतून पैसा ही वृत्ती वाढत आहे यातून संघर्ष, मग्रुरी, मतदारांना गृहीत धरले जाऊ लागले आहे. लातूरकर मतदार हा संवेदनशील, विचारी आणि लोकशाहीवर प्रेम करणारा आहे. काय चांगले आणि काय वाईट हे ठरवण्याची वेळ आली आहे. लातूरच्या सुजान, दक्ष मतदारांनी आता कसल्याही आमिषाला, आश्वासनाला, प्रलोभनाला बळी न पडता आपले संवेधानिक कर्तव्य निर्भयपणे पार पाडायचे आहे. शिक्षित, समाजभान असणारे, कार्यतत्पर, निष्कलंक उमेदवार निवडून देत राजकारणातील आपला सुशिक्षितपणा सिद्ध करण्याची गरज आहे. चला मतदान करून लातूरचा सुसंस्कृतपणा जपू या. 

सतीश तांदळे 
माझं लातूर परिवार

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post