नायगाव येथे हॉटेल मालकाचा निर्घृण खून.अवघ्या पाच तासांत तिन्ही आरोपी जेरबंद.
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे चाकूर यांची संयुक्त, वेगवान कारवाई.
![]() |
| मयत बार मालक गजानन नामदेव कासले |
![]() |
| पोनि सुधाकर बावकर -स्थानिक गून्हेशाखा, लातूर (राष्ट्रपति पदक विजेता ) |
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नायगाव येथे घडलेल्या एका अत्यंत गंभीर व खळबळजनक घटनेत बी. एन. बार अॅन्ड रेस्टॉरंटचे मालक यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मात्र या गंभीर गुन्ह्यात लातूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या पाच तासांत तिन्ही आरोपींना अटक करून बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. नायगाव येथील बी. एन. बार अॅन्ड रेस्टॉरंटचे मालक गजानन नामदेव कासले (वय ४२, रा. नायगाव, ता. चाकूर) हे आपल्या हॉटेलमध्ये असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन इसमांनी संगनमत करून बारमध्ये बळजबरीने प्रवेश केला. आरोपींनी दारू व सिगारेट देण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके व काठ्यांनी गजानन कासले यांच्या डोक्यावर व शरीरावर जबर मारहाण केली. या भीषण हल्ल्यात गजानन कासले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेत बारमध्ये काम करणारा वेटर अजय भरत मोरे (वय २८, रा. अजनी, ता. अहमदपूर) यालाही आरोपींनी काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच बारमधील टीव्हीचे नुकसान करून कॅश काउंटरमधील अंदाजे १० ते १५ हजार रुपये रोख रक्कम व विदेशी दारूच्या बाटल्यांची चोरी करून आरोपी फरार झाले होते.
या प्रकरणी मयताचा भाऊ बालाजी नामदेव कासले (वय ३७, व्यवसाय – शेती, रा. नायगाव, ता. चाकूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे हे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुरावे गोळा केले. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत मा. श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याबाबत विशेष सूचना दिल्या. त्यानुसार मा. श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर, तसेच मा. श्री. रविंद्र चौघर, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे चाकूर यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली.
आरोपींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या पाच तासांत या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत :
1) मारुती ऊर्फ बबलू हरिबा बोयणे,
2)संतोष राम तेलंगे,
सागर हणमंत बोयणे,
(सर्व रा. धवेली, ता. रेणापूर)
सदर आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे चाकूर येथे हजर करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर तसेच पोलीस ठाणे चाकूरचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी भंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोउपनि राजेश घाडगे,पोलीस अंमलदार संजय कांबळे, विनोद चलवाड, सूर्यकांत कलमे, माधव बिलापट्टे, प्रशांत स्वामी, राजेश कंचे, पाराजी पुठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे, श्रीनिवास जांबळे, तसेच पोलीस ठाणे चाकूरचे उपनिरीक्षक पंकज निळकंठे, मंगेश चव्हाण, दामोदर सिरसाठ व शौकत बेग यांचा समावेश होता.
लातूर पोलिसांनी दाखवलेली ही जलद, समन्वयपूर्ण व प्रभावी कारवाई केली असून गंभीर गुन्ह्यांबाबत पोलीस प्रशासन कोणतीही तडजोड न करता आरोपींना तात्काळ न्यायालयासमोर उभे करणार असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
Tags:
LATUR


