डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय ‘शेड्युल्ड ड्रग्ज’ची विक्री करू नका-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन पदाधिकारी यांची बैठक
• व्यसनासाठी औषधांचा वापर रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
• युवा पिढीला व्यसनाधीन बनण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
लातूर, दि. १३ (जिमाका) : डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय प्रवर्गीय औषधे अर्थात शेड्युल्ड ड्रग्जची विक्री केली जावू नये. तसेच अशा औषधे विक्रीची माहिती औषध विक्रेत्यांनी जतन करून ठेवणे आवश्यक असून लातूर जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी या नियमांचे पालन करावे. प्रवर्गीय औषधांचा वापर व्यसनासाठी केला जावू शकत असल्याने सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. आपल्या लातूर जिल्ह्यातील युवा पिढीला व्यसनाधीन बनण्यापासून रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असून केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त प्रमोद काकडे, बळीराम मरेवाड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
औषधांचा नशेसाठी वापर होणे, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व औषध विक्रेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. लातूर जिल्ह्यातील युवा पिढीमधील व्यसनाधिनता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत औषध विक्रेत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रवर्गीय औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय न करण्याचा संकल्प करावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यास समाजाला दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करायला हवे. प्रवर्गीय औषधांची विक्री करताना नियमांचे पालन न करणाऱ्या औषधे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच व्यसनाधिनता कमी करण्यासाठी प्रबोधनही केले जाणार आहे. लातूर शहरातील हॉस्टेल चालक, ट्युशन क्लासेसचे संचालक, महाविद्यालये यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
युवकांना व्यसनाधीन बनविण्यासाठी प्रवर्गीय औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय अशी औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय अशी औषधे देण्यासाठी कोणीही दबाव टाकत असेल तर विक्रेत्यांनी त्याची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी. तसेच अशी औषधे अनधिकृतपणे विकणाऱ्यांची माहितीही प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यावेळी म्हणाले.
जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचा निर्धार !
युवा वर्गातील व्यसनाधिनता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार लातूर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉक्टरांची चिट्टी असल्याशिवाय कोणताही विक्रेता प्रवर्गीय औषधांची विक्री करणार नाही, असे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच औषध विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.
‘से नो टू ड्रग्ज’चे फलक दर्शनी भागात लावा
Tags:
LATUR
