ओसवाल जैन ट्रस्ट व जीवनदीप फाउंडेशनच्या वतीने ६०० दिव्यांगांना दीपावली किराणा किटचे वाटप
लातूर : नवी मुंबई ओसवाल जैन ट्रस्ट व जीवनदीप फाउंडेशन लातूरच्या संयुक्त विद्यमाने दीपावली सणानिमित्त ६०० हुन अधिक दिव्यांगांना किराणा किटचे मोफत वाटप करण्यात आले.
लातूर शहरातील कोरे गार्डनमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास नवी मुंबई ओसवाल जैन ट्रस्टचे संचालक निर्मल दर्डा , नायब तहसीलदार औसा सुरेश पाटील, यशवंत नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुहास पाचपुते, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोष नाईकवाडे, सेवानिवृत्त तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक रमाकांत चाटे, उद्योजक संतोष कोटेचा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जीवनदीप फाउंडेशन लातूर आणी नवी मुंबई ओसवाल जैन ट्रस्ट, यांच्या संयुक्त विद्यामाने लातूर येथे प्रति वर्षाप्रमाणे ६०० दिव्यांग कुटुंबीयांना दीपावली किराणा किट वाटप केले गेले. गेल्या वर्षीही ३०० लोकांना अशा किटचे वाटप करण्यात आले होते. पुढील वर्षी किमान १००० परिवारांना अशा प्रकारचे किट वाटप करण्याचा प्रयत्न राहणार आहे. दिवाळीच्या आनंदापासून कोणीही वंचित राहू नये, या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते.
जीवनदीप फाउंडेशन गेल्या ११ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षी महानगर पालिका, जिल्हा परिषद व गरीब शाळांमधील २२ हजारांहून अधिक विद्यार्थींना प्रत्येकी ६ रजिस्टर व ४ वही असे देण्यात आले होते आणि या वर्षीही त्यात वाढ करून ४१ हजार विद्यार्थ्यांना देण्यात आले. या दोन्ही कार्यात मोलाचा वाटा प्रयास फाउंडेशन ट्रस्ट, व नवी मुंबई ओसवाल जैन ट्रस्ट, यांचा आहे. सोबतच लातूर येथील राजेश मुकेश मित्तल, जयनारायण खंडेलवाल, अविनाश आळंदकर, सौ. रेखा भिलावे, दशरथ माने यांचेही मोलाचे अर्थसहाय्य लाभले आहे. या बरोबरच जीवनदीप फाउंडेशनच्या वतीने गेल्या महिन्यात श्री संत गाडगे बाबा मतीमंद शाळेच्या सर्वच विद्यार्थ्याना शालेय गणवेश देण्यात आले आहेत.
महिला सक्षमीकरणात सुद्धा मोलाचे योगदान जीवनदीप फाउंडेशन देत असते, आणि सिंगल पालकांच्या 22 मुलींचे विवाह स्वखर्चाने करून दिले आहे. महिला स्वावलंबन साठी आवश्यकतेनुसार कधी शिलाई मशीन तर कधी पिठाची गिरणी, तर कधी पिको मशीन देत असते. तसेच अनेक महिलाना रोजगार उपलब्ध करून देत असते. महिला आत्मनिर्भर होण्यासाठी छोटे छोटे काम मिळवून देते. उदा. साबण बनवणे, विकणे, पिशवी बनवणे, विणकाम करविणे इत्यादी उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. जीवनदीप फाउंडेशन आरोग्य क्षेत्रात ही संस्था खूप भरीव काम करते, जसे की डेंटल कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प, आय कॅम्प, मोतीबिंदू ऑपरेशन इत्यादी कॅम्प घेत असते. सोबत वृक्षारोपणाचे कार्यक्रम, लातूर स्वच्छता अभियान असे विविध उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ लातूर,निरोगी लातूर साठी सतत प्रयत्नशील आहे. दिपावलीनंतर १ हजार गोरगरीब मुलांना स्वेटर वितरित करण्याचा मानस आहे. तसेच एक रुग्णवाहिकाही देण्याचा मानस असल्याचे जीवनदीप च्या अध्यक्षा सौ. संगीता दिलीपचंद चोपडा यांनी सांगितले. यावेळी निर्मल दर्डा , सुहास पाचपुते, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीपचंद चोपडा, बालाजी कोटलवार, रामेश्वर लढ्ढा, सोनाली चोपडा, स्वाती काळे, अरुणा दामा आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेश डुंगरवाल यांनी केले.
Tags:
LATUR

