Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

निलंग्याच्या निळकंठेश्वर मंदिराला मिळणार राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

निलंग्याच्या निळकंठेश्वर मंदिराला मिळणार राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी माजी मंत्री, आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा पाठपुरावा



लातूर/प्रतिनिधी : निलंगा शहराचे ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदीर ऐतिहासिक असून याची ओळख दक्षिण काशी म्हणून सुध्दा आहे. शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या या मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती. या संदर्भात राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेवून माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी निळकंठेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती दिली. यावेळी सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी तात्काळ याबाबत सकारात्मकता दाखवत निळकंठेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता निलंग्याच्या निळकंठेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळून हा ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे.

निलंग्याचे ग्रामदैवत असलेले निळकंठेश्वराचे मंदीर म्हणजे शेकडो वर्षाचा ऐतिहासिक वारसा आहे. या मंदिराची उभारणी चालुक्यांच्या काळात झाली असून हे मंदिर म्हणजे स्थापत्य आणि मूर्तीकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. या मंदिरात दोन गर्भगृह असून मुख्य गर्भगृहात शिवलिंग स्थापित झाले आहे. तसेच दुसºया गर्भगृहात अतिशय दूर्मिळ मानली जाणारी उमा महेश्वर यांची मूर्ती विराजमान झालेली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या बाह्यभागावर शंभरहून अधिक विलोभनिय शिल्पमूर्ती कोरलेल्या असून यामध्ये शिव, विष्णू, महिशासूर मर्दिनी यासारख्या देवतांसह सूर सुंदरीच्या प्रतिमांचा समावेश आहे. हे मंदीर हेमाडपंथी असून याची दक्षिण काशी म्हणूनही ओळख आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी आणि पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक भाविक सातत्याने निलंगा येथे येत असतात. त्याच बरोबर श्रावण महिन्यात तर या ठिकाणी मोठी गर्दी होवून कर्नाटक राज्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. 

काळाच्या ओघात या मंदिराची थोडीफार झालेली झिज लक्षात घेवून आणि या मंदीराचे मूळ रूप परत आणण्यासाठी माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या माध्यमातून या मंदिराच्या संवर्धनाचे काम पुरातन खात्याच्या वतीने सुरू झाले आहे. याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून अकरा कोटी तेविस लाखांचा विशेष निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या लगतच दूर्मिळ अशा खारवणी व गोडवणी अशी दोन बारवा आहेत. ऐकमेकांना लागून असलेल्या या दोन जलस्त्रोतापैकी एकात गोड तर दुसºयात खारे पाणी आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व चमत्कारिक असलेल्या या बारवांचेही जतन होणे तितकेच आवश्यक असल्याचे माजी मंत्री आ. निलंंगेकर यांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याच बरोबर दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या निळकंठेश्वर मंदिराचे महत्व आणि त्याची इत्त्यभंूत माहिती दिल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी निळकंठेश्वर मंदिराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा देण्यासाठी तात्काळ मान्यता देवून यासाठी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. 

यामहत्वपूर्ण निर्णयाबद्दल माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, निळकंठेश्वर मंदीर आपल्या शहराचा आत्मा असून हजारो वर्षापासून श्रध्दा, इतिहास आणि कला या तीन गोष्टींचा सगंम येथे असल्याचे सांगितले. हा ऐतिहासिक आणि पुरातन ठेवा पुढील पिढीसाठी जतन करणे ही आपली सामुहिक जबाबदारी असल्यामुळे या मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता, असे स्पष्ट केले. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी यास मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार मानुन या निर्णयामुळे निळकंठेश्वर मंदीर केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर मराठवाडा आणि राज्याच्या नकाशावर झळकणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post