"बालकिशन मुंदडा" [मुंदडा गुरुजी] "महेश भूषण" पुरस्काराने सन्मानित...
लातूर : येथील माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा सनरीच ऍक्वाचे मुख्य संचालक श्री बालकिशनजी पांडुरंगजी मुंदडा ( गुरुजी )यांना लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने "महेश भूषण 2025" या पुरस्काराने दयानंद सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात अनेक सन्माननीय प्रभ्रुतीच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. महेश नवमी उत्सव 2025 चे औचित्य साधून लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने सामाजिक सेवा, सांस्कृतिक कार्यक्रम तथा औद्योगिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. हैदराबादच्या ख्यातनाम उद्योजिका तथा माहेश्वरी सभेच्या प्रखर समाजसेवी आणि कट्टरपंथी सनातनी सौ.भगवती महेश बलदवा यांच्या हस्ते दयानंद सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या भव्य समारंभात बालकिशन मुंदडा यांना "महेश भूषण 2025" पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सीए प्रकाश कासट ,सचिव फुलचंद काबरा,अ.भा. महासभा सदस्य हुकूमचंद कलंत्री, जिल्हा माहेश्वरी सभेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश सारडा,महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.अनिता मालू,प्रदेश युवा संघटनेचे संघटन मंत्री श्री रामजी भुतडा, जिल्हा सभेचे कार्यसमिति सदस्य राजेशकुमार मंत्री, कोषाध्यक्ष जगदीश भुतडा,विजयकुमार चांडक,सौ.मंगल लड्डा, अभिषेक मुंदडा, एड. नंदकिशोर लोया,ईश्वर बाहेती,संतोष तोष्णीवाल,गणेश हेड्डा,चंदूशेठ लड्डा, राहुल लोया आदी मान्यवरांची उपस्थिती होती.याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना बालकिशन मुंदडा यांनी सर्वांच्या सहकार्याने आपण जीवनात यशस्वी होऊ शकलो,असे नमूद केले.या पुरस्काराने आपल्याला आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच योग्य नियोजनाचीही आवश्यकता असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवले पाहिजे.यश मिळवताना अनेक संकटांचा सामना करावाच लागतो. अशावेळी समाज - परिवार खंबीर साथ देत असतो. यासाठीच सोबत सकारात्मक विचार प्रगतीसाठी असणे लाभदायक असते.कठीण परिस्थितीचा दृढ़ निश्चय व हिंमतीने सामना केल्यास यश निश्चितच मिळते मग ते क्षेत्र कोणतेही असो. यशस्वीतेसाठी सर्वानाच स्पर्धेला सामोरे जावेच लागते. त्यासाठी सर्वांनाच सोबत घेऊन अथक प्रयत्न केले पाहिजे. समाज जीवनात वावरताना, काम करताना चुका होत असतात. अनावधानाने झालेल्या चुकांमधून सावरून यश संपादन करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. आजच्या युवा पिढीतील काही युवक चुकीच्या मार्गांचा अवलंब करताना आढळून येत आहे. त्यावर वेळीच योग्य ती उपाययोजना करून त्यांना यशस्वी होण्यासाठी अंमलात आणणे गरजेचे असल्याचे सांगून मुंदडा गुरुजींनी माहेश्वरी समाजाचे संघटन वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या पुरस्कारामुळे समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी कितीतरी पटींनी वाढल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
महेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल विविध स्तरातील मान्यवरांनी बालकिशन मुंदडा यांचे अभिनंदन केले आहे.
------------------------------------------
