Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

स्वच्छ तीर्थ' अभियानांतर्गत जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वच्छ तीर्थ' अभियानांतर्गत जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

* डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत नागरी भागात होणार 'स्वच्छतेची १०० ठिकाणे'






लातूर, दि. २० (जिमाका) : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्याच्या आजबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी 'स्वच्छ तीर्थ' मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता करण्यासाठी आयोजित मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या तीन दिवसांत या मोहिमेंतर्गत शहरी भागात १०१ धार्मिक स्थळांची, तसेच ग्रामीण भागातही विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता करण्यात आली.

लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख १० धार्मिक स्थळांसह नागरी भागातील १०१ धार्मिक स्थळे व त्यांच्या परिसरात स्वच्छ तीर्थ मोहिमेंतर्गत स्वच्छ्ता उपक्रम राबविण्यात आला. गेल्या तीन दिवसांत झालेल्या या उपक्रमात अधिकारी, स्वच्छता कर्मचारी यांच्यासाह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धार्मिक स्थळांकडे जाणारे रस्ते, परिसरातील बारव यांची या मोहिमेंतर्गत स्वच्छ्ता कऱण्यात आली. या दरम्यान नागरी भागात सुमारे १० टन कचरा संकलित करण्यात आला, अशी माहिती नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी दिली.

ग्रामीण भागातही विविध ठिकाणी ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी धार्मिक स्थळांची स्वच्छता, तसेच परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरी व शहरी भागात राबविण्यात आलेल्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

*नागरी भागात १०० ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणार*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी लातूर जिल्ह्यातील नागरी भागातील १०० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याठिकाणी डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. तसेच या ठिकाणांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यामाध्यमातून 'स्वच्छतेची १०० ठिकाणे' तयार केली जाणार आहेत.

*डीप क्लीन ड्राईव्हमध्ये नागरिक स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*

लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्वच नागरी भागांमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह अर्थात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणी नियमितपणे टप्प्या-टप्प्याने संपूर्ण स्वच्छता केली जाईल. या मोहिमेमध्ये नागरिक, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग आवश्यक आहे. तरी आपल्या शहरात, परिसरात डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत आयोजित स्वच्छता उपक्रमात सर्वांनी सहभागी होवून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post