Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आनंदाचा शिधा उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

आनंदाचा शिधा उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन




मुंबई, दि. 13 : आनंदाचा शिधा उपक्रम सर्वसामान्यांच्या आयुष्यात आनंद देणारा ठरेल. हे काम खरं तर खूप मोठे असून हा उपक्रम राबवताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

वर्षा निवासस्थान येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाच्या लाभार्थींशी संवाद साधण्यासाठी उपस्थित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कान्हुराज बगाटे, विभागाचे अधिकारी, राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडक 50 लाभार्थी जिल्हा कार्यालयातील एन आय सीच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले आहेत. आनंदाचा शिधा वितरण हा उपक्रम सुरू करण्यात आला.दिवाळीत याचे वाटप केले तेंव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आत्ता देखील गुढीपाडवा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्यात येत आहे. हा शिधा संच वेळेत मिळावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. 100 टक्के साहित्य जिल्ह्यांना पोहचले आहे,यातील शिधा संचचे 70 टक्के लाभार्थ्यांनी उचल केली आहे.उर्वरित साहित्य वाटप करण्यात यावे यासाठी प्रशासनाने कार्यवाही गतीने करावी.

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस पडत आहे.आम्ही सगळेजण शेतकऱ्यांची दुःख जाणून घेत आहोत त्यासाठी प्रभावी उपाय योजना देखील करत झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करत आहोत.केंद्र सरकारच्या धर्तीवर असलेली पी. एम. किसान योजना तशीच राज्य शासन ही नमो सन्मान योजनाही सुरू केली आहे. दुष्काळी भागातील प्रती शेतकऱ्यांसाठी 1800 रुपये देत आहोत. राज्य शासन अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्व घटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आनंदाचा शिधा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वेळेत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आत्तापर्यंत एक कोटी 58 लाख जनतेपर्यंत हा शिधा पोहोचलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आनंदाचा शिधा, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (बोनस), शिवभोजन थाळी पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज लाभार्थ्यांना मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधता येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे असेही मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.

आनंदाचा शिधा मुळे आनंद मिळाला

लाभार्थ्यांनी दिली प्रतिक्रिया

आनंदाचा शिधामुळे आम्हाला बाजारभावापेक्षा कमी किमतीत वस्तू उपलब्ध होत असून आमच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. कितीही रांगा असल्या तरी शिवभोजन घेतल्याशिवाय आम्ही जात नाही आणि माझा सकाळचा स्वयंपाक ही मला करावा लागत नाही अशी बोलकी प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. तसेच या योजनांच्या बाबतीत जिल्हास्तरावरती सुरू असलेली कार्यवाही बाबत माहिती घेतली.

       प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री यांच्या हस्ते "आनंदाचा शिधा" संचाचे वितरण ही लाभार्थ्यांना यावेळी करण्यात आले.

लातूर येथून आनंदाचा शिधा, शिवभोजन योजनेच्या लाभार्थ्यांचा सहभाग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांचा लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातून ‘आनंदाचा शिधा’ आणि शिवभोजन योजनेचे निवडक लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सावंत, लातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post