प्रगतशील व विकसित लातूरसाठी भाजपला साथ द्या-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : लातुरात भाजपाची ऐतिहासिक विजय संकल्प सभा
लातूर/प्रतिनिधी : लातूरचा विकास हे माझे ध्येय आहे. त्यासाठी लातूरकरांना भरभरून निधी आजवर दिला आहे. यापुढेही लातूरला कमी पडू दिले जाणार नाही. लातूरला विकसित शहर करण्यासाठीच मुंबईशी जोडले जात आहे. भविष्यात प्रगतीशिल व विकसित लातूरसाठी भाजपाला साथ द्या. लातूरच्या विकासाची जबाबदारी माझी असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानावर भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी लातूर येथे विजय संकल्प सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, निवडणुक प्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, संघटन सरचिटणीस संजय कौडगे, डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी खा. सुनिल गायकवाड, सुधाकर श्रृंगारे, माजी आ. बब्रुवान खंदाडे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, गोविंद केंद्रे, त्रिंबकनाना भिसे, अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्व उमेदवार उपस्थिती होती.
जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृध्दी महामार्गाने औद्योगिकरण वाढले. रस्ते हा विकासाचा महार्गातील महत्वाचा टप्पा आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांना मुंबईशी जोडले तर येथील विकास गतीने होणार आहे. त्यासाठीच लातूरला मुंबईशी व वाढवण बंदराला जोडण्यासाठी लातूर -कल्याण महामार्ग तयार होणार आहे. यामुळे अवघ्या पाच तासात मुंबईत पोहोचता येणार आहे. हा महामार्ग लातूरच्या प्रगतीचा महामार्ग ठरेल.
लातूरकरांचा विकास हे माझे एकमेव ध्येय आहे. लातूरकरांनी भाजपाच्या पाठीशी उभे रहावे. लातूरचा संपूर्ण विकास करण्याची जबाबदारी मी घेतो. लातूरचा चेहरा- मोहरा बदलून दाखवू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. लातूरसाठी आत्तापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. शहराला शुध्द पाण्यासाठी २५९ कोटी रुपयांची पाणीयोजना मंजूर केली. पुढील तीन-चार महिन्यात या योजनेच्या दुसºया टप्प्याला मंजुरी दिली जाणार आहे. शहरात भुयारी गटार योजनेसाठी ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. आधुनिक जिल्हा रुग्णालयासाठी निधी वर्ग केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फुटी पुतळा उभारणीसाठी १० कोटी रुपये दिले असून त्यासाठी आणखी निधी दिला जाणार आहे. नाट्यगृहासाठी १५ कोटी रुपये दिले असून आणखी २६ कोटी रुपये दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
लातूर शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी नवीन बाह्यवळण रस्त्याचा प्रस्ताव केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करून तेथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी काम केले जाणार आहे. स्व. विलासराव देशमुख मार्गाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आगामी चार महिन्यात लिंगायत समाजासाठी स्मशान भूमी (रूद्रभूमी)ची समस्या दूर केली जाईल. कोच फॅक्टरीच्या माध्यमातून १० हजार स्थानिक युवकांना लवकरच रोजगार उपलब्ध होणार आहे. झोपडपट्टीत राहणाºया नागरिकांना जमिनीच्या मालकीचे पट्टे दिले जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्री यांनी दिले. मात्र यासाठी १५ जानेवारीला तुम्ही कमळाची काळजी घ्या, पुढची पाच वर्षे लातूरकरांची काळजी मी घेईन, असा विश्वास देवून यासाठी लातूर मनपात भाजपाचा महापौर बसवा,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी लातूरकरांना न मागता लातूर-कल्याण महामार्ग दिला. देवाभाऊ हे विकास करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे लातूरमध्ये त्यांच्याच विचारांची सत्ता असणे आवश्यक आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचे कामही देवाभाऊंनीच केले आहे. हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मागील झालेल्या नगरपालिका निवडणुकांत राज्यात सर्वत्र भाजपाला जनतेने साथ दिली, लातूरकरांनीही प्रवाहासोबत रहावे.मुख्यमंत्री राज्याची तिजोरी लातूरसाठी खुली करतील, असा विश्वास पालकमंत्री भोसले यांनी व्यक्त केला.
निवडणुक प्रमुख आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा लातूरला राज्याकडून सर्वाधिक वाटा मिळाला आहे. आताही मुख्यमंत्र्यांनी लातूर कल्याण महामार्ग मंजूर केला. संकटात धावून येणारे नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच दुष्काळात लातूरला पाणी मिळाले. कोविडच्या काळात सत्ता नसतानाही देवाभाऊंनी मुंबई व नागपूर येथून लातूरला आॅक्सिजनचा पुरवठा केला, असेही आमदार निलंगेकर म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, देवाभाऊ म्हणजे विकासाचा कोरा चेक आहे. मराठवाड्याचा दुष्काळ मिटविण्यासाठी या भगिरथाने वॉटरग्रीड सारखी योजना दिली. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती साधण्याचे काम केले, असे त्या म्हणाल्या. यावेळी लिंगायत स्मशानभूमीची अडचण त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
प्रारंभी रामचंद्र तिरुके, माजी खा. सुनिल गायकवाड, शैलेश लाहोटी, गोविंद केंद्रे, पाशा पटेल, अजित पाटील कव्हेकर यांची भाषणे झाली. नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले निलंग्याचे नगराध्यक्ष संजय हलगरकर, रेणापूरच्या नगराध्यक्ष शोभाताई आकनगिरे, उदगीरच्या नगराध्यक्षा सौ. स्वाती हुडे व अहमदपूरचे नगराध्यक्ष स्वप्नील व्हत्ते यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेस गणेश हाके, दिलीपराव देशमुख, राहुल केंद्रे, शैलेश गोजमगुंडे, अॅड. रुद्रालीताई पाटील चाकूरकर, गुरुनाथ मगे, सुधीर धुत्तेकर, अविनाश कोळी, ओम धरणे, निखील गायकवाड, अमोल निडवदे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1 चौकट
लढाई काँग्रेसशी - विलासरावांबाबत आदरच
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, स्व. विलासराव देशमुख यांची राज्यात वेगळी ओळख होती. पक्षाच्या पलिकडे जावून राज्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. काँग्रेसशी आमची राजकीय लढाई आहे. परंतु, स्व. विलासराव देशमुख यांच्याबाबत मनात कायम आदरच असल्याचे त्यांनी सांगितले.
2 चौकट
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले लातूरचे पालकत्व
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी लातूरला जे-जे हवे ते सर्वकाही देण्याचा शब्द दिला. लातूरच्या आशा -आकांक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आम्ही फक्त आश्वासन देत नाही तर शब्द पाळतो, असे सांगितले. येणाºया १५ तारखेला तुम्ही कमळाचे बटन दाबून भाजपाला मनपाची सत्ता सोपवा, पुढील पाच वर्ष विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशा शब्दात आपण लातूरचे पालकत्व स्वीकारले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत स्पष्ट केले. लातुरात भाजपाच जिंंकणार आहे, कमळ फुलणार आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
3 चौकट
स्व. चाकूरकर यांचे स्मारक उभारणार
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर मनपाच्या आवारात स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक उभा करावे, अशी मागणी बोलताना केली होती. या मागणीला तत्काळ मंजूरी देताना मुख्यमंत्री म्हणाले की, लातूरने महाराष्ट्राला नेतृत्वदिले आहे. स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांनी नगराध्यक्षपदापासून केंद्रीय गृहमंत्री व लोकसभेचे अध्यक्ष अशी पदे भूषवली. राजकारणात असे लोक दुर्मिळ असतात. स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही राज्यात नेतृत्व केले. जन्मभूमी नसली तरी लातूर ही कर्मभूमी असणारे स्व. गोपिनाथराव मुंडे यांचेही लातूरमध्ये आल्यानंतर स्मरण केलेच पाहिजे. नेतृत्व तयार करण्याचा गुण लातूरच्या भूमीत आहे. आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मागणीनुसार लातूर महानगरपालिका परिसरात स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मृतीस्थळ राज्य सरकारच्या वतीने विकसित केले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Tags:
LATUR





