स्व. चाकुरकर यांच्या स्मृतीस्थळाची मागणी; आ. निलंगेकर यांच्या राजकीय परिपक्वतेचे दर्शन
लातूर/प्रतिनिधी : मनपा निवडणुक प्रचाराच्या धामधूमीत मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिवंगत केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मृतीस्थळ लातूर शहर महानगरपालिकेत उभारावे अशी मागणी करीत आपल्या राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविले. पक्षविरहित राजकारण कसे असावे याचा वस्तुपाठ घालून देताना आपल्या जिल्ह्याची मान उंचावणाºया नेत्याचा योग्य सन्मान व्हावा ही त्यांची भावना मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी त्याच सभेत राज्य सरकारच्या वतीने स्मृतीस्थळ विकसित करण्याची घोषणाच केली.
मुख्यमंत्र्यांच्याच शब्दात सांगायचे तर लातूरच्या मातीत नेतृत्व घडविणारे गुण आहेत. लातूरचे सुपूत्र स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरचा नगराध्यक्ष, आमदार, राज्यात उपमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, लोकसभा व राज्यसभा सदस्य, लोकसभा अध्यक्ष, विविध मंत्रीपदांसह केंद्रीय गृहमंत्रीपद आणि राज्यपालपदही सांभाळले. एवढे मोठे व्यक्तीमत्व लातूरच्या मातीने देशाला दिले. मृत्यूनंतर या व्यक्तीमत्वाच्या स्मृती जपाव्यात ही आमदार निलंगेकरांची प्रांजळ भावना.
राजकारण आज अत्यंत खालच्या पातळीला जात आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखल फेक करीत आहेत. अशा वातावरणात विरोधी पक्षाच्या नेत्याचे स्मृतीस्थळ विकसित करण्याची मागणी भाजपाचे आमदार निलंगेकर यांनी केली. पक्षाच्याही पलिकडे जावून त्या व्यक्तीमत्वाचा योग्य सन्मान व्हावा ही त्यांची भावना इथे मोलाची ठरते. विशेष म्हणजे या मागणीत कुठलाही राजकीय स्वार्थ दडलेला नाही. त्यातही विरोधी पक्षाकडून मागणी आलेली नाही. असे असताना निलंगेकरांची ही मागणी जशी स्व. चाकूरकर समर्थकांसाठी आनंददायी ठरली तशीच आ. निलंगेकर यांच्या पाठीवर कौतूकाची थाप मारणारीही ठरावी.
जात-पात-धर्म-पक्ष याच्याही पुढे जात आपल्या जिल्ह्याची मान ज्या व्यक्तीमत्वाने उंचावली त्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याची आ. निलंगेकर यांची मागणी मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ मंजूर केली. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या वतीने हे स्मृतीस्थळ विकसित करू असे सांगत त्यांनी स्वत:च्या राजकीय दूरदृष्टीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. निलंगेकर हे तसे पुढच्या पिढीचे नेते. स्व. चाकूरकर यांनी जवळपास पाच दशके राजकीय क्षेत्रात काम केले. याची जाण ठेवत तरुणांचे प्रतिनिधीत्व करणाºया या दोन्ही नेत्यांनी जुना जाणत्या ज्येष्ठ व्यक्तीमत्वाचा सन्मान करावा हे देखील महत्वाचे ठरते.
स्व. शिवराज पाटील चाकूरकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन व्यक्तिमत्वांच्या मध्ये दुवा ठरत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी चाकूरकर यांचे भव्य स्मृतीस्थळ उभारण्यासाठी घेतलेला पुढाकार हा लातूरच्या राजकीय पटलावर अत्यंत महत्वाचा निर्णय ठरणार आहे.
Tags:
LATUR
