आपकी बार लातूरमध्ये ट्रिपल इंजिन सरकार- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
लातूर/ प्रतिनिधी: लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत लातूरमध्ये ट्रिपल इंजिन सरकार येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काळात केलेल्या कामाच्या बळावर आम्ही मतदारांना सामोरे जाणार असून मनपावर भाजपाचा झेंडा फडकणार आहे, असा विश्वास माजीमंत्री आ.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.
मनपा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 30)अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.लातूरमध्ये महायुती म्हणून लढण्यासंदर्भात चर्चा सुरू होत्या. त्या अनुषंगाने माध्यमांशी संवाद साधताना आ.निलंगेकर म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामे होत आहेत. त्यामुळे जनता भाजपाच्या पाठीशी आहे. महायुती संदर्भात विचारणा केली असता आ. निलंगेकर म्हणाले की, तिन्ही पक्षांमध्ये महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तिघांनीही शेवटपर्यंत एकत्रित लढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही हीच भूमिका होती.स्वतंत्र लढू असे आम्ही कधीही म्हटले नाही. युतीसाठी बैठका घेतल्या, चर्चा केली. जागा वाटपाचीही चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही नकार आला नाही परंतु राष्ट्रवादी मधील काँग्रेसच्या बी टीमने महायुतीत मिठाचा खडा टाकला.काँग्रेस स्वतःच्या बाजूने न खेळता विरोधकांच्या बाजूने खेळते.तोच प्रकार यावेळी घडल्याचे आ. निलंगेकर म्हणाले.
युतीसाठी शिवसेनेसोबतही सकारात्मक चर्चा झाली.अनेक प्रभागात भाजप व शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. रिपाई भाजपच्या सोबतच आहे,असे ते म्हणाले.
आ.निलंगेकर यांनी सांगितले की, उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींनी फायनल केले आहे.आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाणार आहोत.आम्ही आजपर्यंत काय कामे केली आणि पुढे काय करणार हे जनतेला पटवून सांगणार आहोत.ही लढाई निलंगेकर विरुद्ध देशमुख अशी नाही तर जनतेच्या हितासाठी, लातूरच्या हितासाठी आम्ही लढणार आहोत.या निवडणुकीत भाजपला 50 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Tags:
LATUR


