अंमली पदार्थ आणि गुटख्याच्या विळख्यातून लातूरच्या तरुणाईला मुक्त करावे ही माझं लातूर परिवाराची अपेक्षा
शांत, सुसंकृत, सुरक्षित आणि शैक्षणिक शहर म्हणून राज्यात नावलौकिक असलेलं माझं लातूर. मात्र गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना शहराच्या तसेच जिल्ह्याच्या लौकिकाला साजेशा नाहीत.
वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे, अंमली पदार्थांची सहज उपलब्धता यामुळे लातूरकरांच्या चिंतेत वाढ होणे साहजिक आहे. गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा पोलिसांकडून जप्त झाला आहे. पोलिसांच्या कारवाईचे निश्चितच स्वागत आहे. पण गुन्हेगारांमध्ये एवढी हिम्मत येतेच कुठून याचा शोध घेणे आवश्यक आहे. नुसत्या कारवाईवर न थांबता या अवैध आणि तरुणाईला अंधकारात नेणाऱ्या तसेच सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या व्यवसायाची पाळे मुळे शोधून ती नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. शहरातील कॅफे सेंटर, चहापाणी या गोंडस नावाखाली चालणारे धूम्रपान गृह, या अवैध व्यवसायाचे वाहक होत आहेत. अशा ठिकाणी विद्यालयातील अल्पवयीन, महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा मुक्त वावर पालकांची चिंता वाढविणारा आहे.
लातूर जिल्ह्याला कार्यतत्पर, कठोर, संवेदनशील, दक्ष पोलीस अधिकाऱ्यांची परंपरा लाभली आहे. "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला न्याय देण्याचे कार्य येथे कर्तव्यास असलेल्या अधिकाऱ्यांनी केले आहे. लातूर शहराने नेहमीच अशा अधिकाऱ्यांना पाठबळ दिलेले आहे. पोलिसांनी खरेच पोलीस होऊन गुन्हेगारांवर वचक बसवावा आणि वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थ, अवैध धंदे या माध्यमातून लातूरचे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर तात्काळ आळा बसेल यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई करावी अशी विनंती माझं लातूर परिवार करीत आहे.
सतीश तांदळे
माझं लातूर परिवार
Tags:
LATUR

