Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र शासन, विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने लातुरात १५ ते १८ फेब्रुवारी दुसरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल

महाराष्ट्र शासन, विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने लातुरात १५ ते १८ फेब्रुवारी दुसरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल

 चार दिवस सिनेरसिकांना २५ देशी-विदेशी चित्रपट पाहण्याची संधी* 
 

*लातूर प्रतिनिधी : मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०२४*
महाराष्ट्र शासन, विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणारा दुसरा लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. १५ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणार आहे. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूरात होत असलेला या फिल्म फेस्टीव्हलमध्ये लातूर व परीसरातील चोखंदळ चित्रपट रसिकांना देश-विदेशातील पंचवीस दर्जेदार सिनेमे पाहता येणार आहे. 

हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पीव्हीआर थिएटरमध्ये होणार असून मराठवाड्यात अजिठा-वेरूळ महोत्सवानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेण्याचा मान लातूरला मिळतो आहे. हा फिल्म फेस्टिवल १८ वर्षांवरील सर्वांसाठी खुला असून नि:शुल्क आहे. 
 *गुरुवारी सायंकाळी शुभारंभ* 
गुरूवार, दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. लातूरचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन अध्यक्षस्थानी असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे व पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे अध्यक्ष व ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल हे उपस्थित राहतील तसेच खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर, लातूरचे खा. सुधाकर शृंगारे, आमदार विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ.सुरेश धस, आ.रमेशअप्पा कराड, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.आबासाहेब पाटील, आ. धीरज देशमुख,आ. अभिमन्यू पवार हे लोकप्रतिनिधी पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्याशिवाय लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे हे प्रमुख शासकीय अधिकारी या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
पुणे एफटीआयचे माजी अधिष्ठाता समर नखाते व पुणे फेस्टिवल चे संचालक विशाल शिंदे व अभिजात फिल्म सोसायटीचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 
 *मागच्या वर्षी भरभरून प्रतिसादा* 
गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या पहिल्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. विशेषतः विद्यार्थी- विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. जागतिक सिनेमाची ओळख करून घेण्यासाठी सर्व स्तरातील प्रेक्षकांनी महोत्सवाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यंदाचे हे दुसरे वर्ष असून यावेळी फेस्टिवलचा एक दिवस वाढवून चित्रपटांची संख्याही वाढविण्यात आली आहे. यावेळीही प्रेक्षक पहिल्या वर्षासारखाच चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. 

 *उद्घाटन बल्गेरियन चित्रपट 'ब्लागाज लेसन'* 
 लातूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन बल्गेरियन चित्रपट 'ब्लागाज लेसन' या चित्रपटाने होणार आहे. अनेक फेस्टिवलमध्ये नावाजलेला हा चित्रपट असून भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने 'रजत मयूर' पुरस्कार पटकावला आहे.
 *दोन मराठी चित्रपट* :
वरील चित्रपटासह एकूण २५ चित्रपट या चार दिवसाच्या महोत्सवात दाखवले जातील. यापैकी जयंत सोमालकर दिग्दर्शित 'स्थळ' व सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' हे दोन मराठी चित्रपट या फिल्म फेस्टिवलचे प्रमुख आकर्षण असेल. याशिवाय भारतीय भाषा विभागातील चार चित्रपट तसेच ग्लोबल सिनेमा विभागात १६ चित्रपट आहेत. त्याचबरोबर दोन गाजलेले माहितीपट पण या महोत्सवात आहेत. अशी रसिकप्रिय चित्रपटांची मेजवानी चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात प्रेक्षकांना मिळणार आहे.
 *समारोपाचा चित्रपट 'अ सेन्सेटिव्ह पर्सन'* 
१८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता टॉमस क्लेन दिग्दर्शित 'अ सेन्सेटिव्ह पर्सन' या झेक चित्रपटाने महोत्सवाचा समारंभ होईल.
जगभरात गाजलेल्या अशा चित्रपटांचा लातूर परिसरातील रसिकांना आस्वाद घेता येणार आहे. जिल्ह्यातील चित्रपट प्रेमींनी चार दिवसीय फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
-----------

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post