Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रविवारी लातुरात केमिस्ट बांधवांकरीता मधुमेहावर चर्चासत्राचे आयोजन : डॉ. अभिजीत मुगळीकर

रविवारी लातुरात केमिस्ट बांधवांकरीता मधुमेहावर 
चर्चासत्राचे आयोजन : डॉ. अभिजीत मुगळीकर 


लातूर : भारत विकास परिषद शाखा लातूर आणि लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लातुरात रविवार, दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी केमिस्ट बांधवांकरीता ' ओळखा आपली जोखीम व जबाबदारी' मधुमेहावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मधुमेह तज्ज्ञ डॉ. अभिजीत मुगळीकर यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 
आज संपूर्ण जगाला मधुमेहाने आपल्या विळख्यात घेतल्याचे पाहावयास मिळते. भारतातही मधुमेहींची संख्या मागच्या काही वर्षात झपाट्याने वाढताना दिसते. मधुमेहावर नियंत्रण कसे आणावे, त्याची कारणे , कोणती दक्षता बाळगणे आवश्यक असते या सर्व बाबी मधुमेह झालेल्याना तसेच संभाव्य रुग्णांनाही माहिती असणे गरजेचे आहे. फार्मासिस्ट अर्थात औषधी विक्रेते हे रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून काम करत असतात. त्याकरिताच रविवारी, केमिस्ट बांधवांकरिता या चर्चासत्राचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. मुगळीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. फार्मासिस्ट मधुमेही रुग्णात जनजागृतीचे कार्य अत्यंत महत्वपूर्णरीत्या करू शकतात. कारण रुग्णांचा डॉक्टरांपेक्षा अधिक संपर्क फार्मासिस्टशी येत असतो.सध्यस्थितीत कोविडनंतर मधुमेह झालेल्या रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे दृष्टीपथास येते. मधुमेह झालेल्या किमान ५० टक्के रुग्णांत मधुमेहाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.पण ती लक्षणे लवकर निदर्शनास आल्यास त्यावर पूर्णपणे नियंत्रण आणणे शक्य होत असते. उपचारादरम्यान रुग्ण आणि प्रत्येक डॉक्टरची मार्गदर्शक तत्वे वेगवेगळी असू शकतात.मधुमेहात रुग्णाच्या विविध तपासण्या करणे आवश्यक असते.त्याशिवाय उपचाराची निश्चितता होत नसते. मधुमेह झालेले रुग्ण जेनेरिकची औषधीही घेऊ शकतात. जीवनशैली बदलली की मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होत असते,. असेही डॉ. मुगळीकर यांनी सांगितले. 
फार्मसिस्ट बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात फार्मासिस्ट्स आणि त्यांच्या परिवारातील सदस्य सहभागी होऊ शकतात,असेही डॉ. अभिजीत मुगळीकर यांनी सांगितले. केमिस्ट्स संघटनेचे तालुका अध्यक्ष ईश्वर बाहेती यांनी यावेळी बोलताना मधुमेह म्हणजे नेमके काय, हे फार्मासिस्ट बांधवांना समजावण्यासाठीच सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तर संघटनेचे सचिव नागेश स्वामी यांनी प्रत्येक फार्मासिस्ट तंत्रज्ञानाने अद्यावत झालाच पाहिजे या नवीन शैक्षणिक प्रणालीनुसार अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. यावेळी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विजय जाधव, सचिव सारंग अयाचित, केमिस्ट संघटनेचे कोषाध्यक्ष राजकुमार राजारूपे, परमानंद हरकुट , फारुख शेख, रोहित बिरादार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post