Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लोकांचा नकाराधिकार हिरावून घेणे लोकशाहीसाठी घातक

लोकांचा नकाराधिकार हिरावून घेणे लोकशाहीसाठी घातक ;
"टू मच डेमोक्रॅसी" डॉक्यूमेंटरी चे दिग्दर्शक वरुण सुखराज यांचे मत.


लातूर : मला हे नको आहे, असे म्हणण्याचा अधिकार लोकशाहीने आपल्याला दिला आहे.हा अधिकार कोणी हिरावून घेत असेल तर ते फार गंभीर आहे. बऱ्याचदा सरकार असे करते. पण जवळचे लोक जर असे मत व्यक्त करत असतील तर लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, असे प्रतिपादन दिग्दर्शक वरूण सुखराज यांनी केले.
अभिजात फिल्म सोसायटी तर्फे 19 ऑगस्ट 2023 रोजी श्रीकिशन सोमाणी शाळेच्या सभागृहात दिग्दर्शक वरूण सुखराज यांनी दिग्दर्शित केलेली 'टू मच डेमोक्रॅसी' ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. सन 2020 -21 या कालावधीत दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी दीर्घ आंदोलन केले होते. यावर आधारित ही फिल्म आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या प्रश्नांना वरूण सुखराज यांनी वरील विचार व्यक्त केले. ही फिल्म पाहण्यासाठी लातूर करांची चांगली उपस्थिती होती.
अलीकडील काळात देशात दोन अभूतपूर्व अशी आंदोलने झाली. पहिले अण्णा हजारे यांचे आंदोलन व त्यानंतरचे शेतकरी आंदोलन. पहिल्याच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मुख्य प्रवाहातील माध्यमांनी खूप कमी प्रसिद्धी दिली. इतकेच नाही तर शेतकरी आंदोलकांना खलिस्तानवादी, देशद्रोही म्हटले गेले. या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना वरूण सुखराज म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे की तोट्याचे हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण त्यांचे म्हणणेच न ऐकून घेता, त्यांना गोळ्या घाला म्हणणे कितपत योग्य आहे? काही लोकांनी आंदोलनांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना इतक्या टोकाची भूमिका कशी काय घेतली?
आंदोलनाला बाहेरून निधी पुरवठा होतो असा आरोप केला गेला. तो पूर्णपणे चुकीचा होता, असे त्यांनी उत्तरात सांगितले.
दिल्लीच्या सीमांवर २०२०-२१मध्ये झालेले शेतकऱ्यांचे महाआंदोलन हा या डॉक्युमेन्ट्रीचा विषय आहे. याला आपण डॉकूफीचर म्हणू शकतो. कारण ती जे दाखवते, सांगते ते माहितीपट वा वृत्तपट या मराठी शब्दांच्या पर्यावरणात न बसणारे आहे. ही डॉक्युमेन्ट्री माहिती आणि बातमी याच्यापलीकडे जाणारी आहे. ती विशिष्ट विचार घेऊन उभी आहे आणि म्हणून ती तटस्थ नाही. ती लोकशाहीचा पक्ष घेऊन उभी आहे. असा पक्ष घेणे हे फार धाडसाचे काम असते. ते धाडस वरुण सुखराज यांनी केले आहे.प्रारंभी वरूण सुखराज यांचे स्वागत 'अभिजात' चे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले तर सचिव शाम जैन यांनी त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती गोवंडे यांनी केले व प्रा. ज्ञानेश्वर चौधरी यांनी आभार व्यक्त केले.
डॉक्युमेंटरीच्या प्रदर्शनानंतर झालेल्या चर्चेत शेषराव मोहिते, शिवाजी शिंदे व इतरांनी भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजात चे धनंजय कुलकर्णी, डॉ. विश्वास शेंबेकर, डॉ. स्वप्नील देशमुख,अभिषेक बुचके,आदित्य कुलकर्णी,प्रणाली कोल्हे व देवयानी बागल आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post