Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

विवेकानंद रुग्णालयात एकाच दिवशी ९ बालकांवर ह्रदय शस्त्रक्रिया

विवेकानंद रुग्णालयात एकाच दिवशी ९ बालकांवर ह्रदय शस्त्रक्रिया





   लातूर/प्रतिनिधी:येथील विवेकानंद रुग्णालयात डॉक्टरांनी ९ बालकांवर एकाच दिवशी ह्रदय शस्त्रक्रिया करण्याची कामगिरी पार पाडली.विशेष म्हणजे यापैकी ३ ओपन हर्ट सर्जरी होत्या.
   विवेकानंद रुग्णालयात एकाच छताखाली सर्व प्रकारचे अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत.त्यात ह्रदय शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. मुळातच ह्रदय शस्त्रक्रिया किचकट असते.त्यात बालकांची शस्त्रक्रिया असेल तर गुंतागुंत अधिक असते.या सर्व अडचणींवर मात करत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केल्या.
888
    या संदर्भात माहिती देताना बाल हृदयरोग तज्ञ डॉ.नितीन येळीकर यांनी सांगितले की, एकाच दिवशी झालेल्या या ९ शस्त्रक्रियांपैकी ८ शस्त्रक्रिया या हृदयाच्या छिद्रासंदर्भातील होत्या. या ८ पैकी तीन बालकांवर ओपन हर्ट सर्जरी करण्यात आली. उर्वरित ५ बालकांवर बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.विना ऑपरेशन हृदयातील अरुंद वॉल उघडण्याची शस्त्रक्रियाही याच दिवशी करण्यात आली.ज्या बालकांवर बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यांची २४ तासानंतर रुग्णालयातून सुट्टी करण्यात येते. ओपन हर्ट सर्जरी झालेल्या बालकांना मात्र ४ ते ५ दिवस शस्त्रक्रियेनंतर उपचार घ्यावे लागतात,असे डॉ नितीन येळीकर यांनी सांगितले.
   मुंबईतील एशियन हर्ट इन्स्टिट्यूटचे डॉ.सारंग गायकवाड,भूलतज्ज्ञ डॉ.प्रविण लोव्हाळे यांच्यासह मुंबईतील शशिकांत नेमहाळे व निहाल बिन नसीर यांनी या तीन चिरफाड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.डॉ.नितीन येळीकर व हैदराबाद येथील केअर हॉस्पिटलचे डॉ.प्रशांत पाटील यांनी सहा बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.शस्त्रक्रियेनंतर सर्व बाल हृदयरोग रुग्णांची देखभाल ही अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ चंद्रशेखर औरंगाबादकर तसेच लातूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.महेश सोनार यांनी केली.
  पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका, डॉ.गोपीकिशन भराडिया, डॉ.अरुणा देवधर, डॉ ब्रिजमोहन झंवर,कार्यवाह डॉ.राधेशाम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर,व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे यासाठी सहकार्य लाभले.विशेष म्हणजे एकूण झालेल्या ९ शस्त्रक्रियांपैकी ७ शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्या. 
  पूर्वीच्या काळी पुणे- मुंबई किंवा हैदराबाद येथे जाऊन कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया आता विवेकानंद रुग्णालयात होत आहेत.लातूरसह मराठवाडा आणि सीमावर्ती भागातील रुग्णांना याचा मोठा लाभ होत आहे.विवेकानंद रुग्णालयात दर महिन्याचा तिसरा शनिवार व रविवारी अशा शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहनही डॉ.नितीन येळीकर यांनी केले आहे

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post