'सत्ता, पैसा आणि दडपशाहीचा अहंकार मोडून काढा';
गंगाखेड नगर परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजयी करण्याचे
आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन
लातूर प्रतिनिधी: शनीवार: २९ नोव्हेंबर २०२५:
भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, आणि सर्वसमावेशक कारभार करून, गंगाखेड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करावे, असे आवाहन आज सकाळी गंगाखेड येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सकाळी गंगाखेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभेत जनतेशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
या प्रचार सभेस माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, काँग्रेस पक्षाच्या एससी सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, श्री इनामदार, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष युनुस शेख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते, या सभेला गंगाखेडच्या जनतेकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दक्षिणेतील काशी आणि संत जनाबाईंचे जन्मस्थळ म्हणून ओळख असलेल्या परभणी जिल्ह्यातील गोदाकाठचे गंगाखेड हे सामाजिक एकोपा जपणारे शहर आहे, असून या शहराने कायम काँग्रेस पक्षाला साथ दिली असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नमूद केले.
राज्यात आणि देशात सध्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवणाऱ्या मंडळींनी एकाधिकारशाही चालवली आहे, गंगाखेड मध्येही हे लोन आता येऊन पोहोचले आहे, लोकांचा कितीही विरोध असला तरी दडपशाही आणि पैशाचा जोरावर आपण निवडणुका जिंकू शकतो असे सत्ताधाऱ्यांना वाटू लागले आहे, त्यांचा हा अहंकार मोडीत काढण्याची संधी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपणाला मिळालेली आहे. सर्वधर्मसमभाव मांडणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) आघाडीने येथे नगराध्यक्ष पदासाठी उजमामाई युनुस शेख या सुशिक्षित युवतीला उमेदवारी दिली असून नगरसेवक पदासाठीही कार्यक्षम उमेदवार दिले आहेत असे यावेळी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.
शहरात राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी मंजूर निधी त्याच ठिकाणी खर्च करून दर्जेदार कामे करण्याची हमी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने देण्यात येत आहे, त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता, निर्भयपणे हाताचा पंजा आणि आणि तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून काँग्रेस उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन शेवटी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
---------







