आयुक्तांच्या खोट्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र मनपाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा
लातूर /प्रतिनिधी: मनपा आयुक्तांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन लिपिक पदावर नियुक्तीपत्र दिल्याचे उघड झाल्यानंतर पालिकेकडून पोलिसांना कारवाईसाठी कळविण्यात आले आहे.नागरिकांनीही सावध रहावे, असा इशाराही देण्यात आला आहे.
लातूर शहरातील शुभम बाळासाहेब गरड, श्रीमती ज्ञानेश्वरी रवी गरड, मारुती भगवान शिवणे, आदित्य बंकट भिंगे,सोमनाथ लक्ष्मण पांचाळ, बापूराव धोंडीराम हुडे यांनी आपली लिपिक पदावर नियुक्ती झाल्याचे आदेश जोडून ते आदेश अधिकृत आहेत काय? या संदर्भात माहिती मागवली होती. मनपाला याबाबत पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली.त्यावेळी या प्रकारात मनपाचा काहीही संबंध नाही.हे नियुक्तीपत्र मनपातून देण्यात आलेले नाही.कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी यात सहभागी नाही.नियुक्ती पत्र खोटे असून आयुक्तांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचे निदर्शनास आले.यानंतर आयुक्तांनी आदेश देऊन संबंधितांवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांना कळविण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांनी सावध राहून अशा प्रकारे आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags:
LATUR
