बनावट खरेदी खताच्या अधारे जमिन बळकावणार्याला मिळाला न्यायालयाचा दणका
लातूर/प्रतिनिधी : मुरुडजवळ असलेल्या गट नं.४९० मधील २७ गुंठे जमीन बनावट खरेदी खताच्या अधारे गणेशलाल चांडक हे बळकाविण्याचा प्रयत्न करीत होते. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने फिर्यादी स्रेहित बाबूलाल बाहेती यांची बाजू घेत चांडक यांना दणका दिलेला आहे. या निकालामुळे स्रेहिल बाबूलाल बाहेती यांनादिलासा मिळाला असून आता या जमिनीवर बाहेती यांचा हक्क असल्यामुळे तेथे चांडक यांना जाण्यास मज्जाव झालेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २०१८ साली गणेशलाल चांडक यांनी भाजीभाकरे बंधू यांना त्यांच्या वैयक्तिक कामासाठी कर्ज दिले होते. या बदल्यात चांडक यांनी भाजीभाकरे यांच्याकडून कोरा स्टँप पेपर व चेक घेतलेला होता. या कागदपत्रांचा गैरवापरकरत चांडक यांनी बनावट खरेदीखत तयार केले होते. विशेष म्हणजे हे खरेदीखत नोंदणीकृत अथवा नोटरी केलेले नव्हते तसेच या खरेदीखतावर भाजीभाकरे बंधू यांची स्वाक्षरीही नव्हती. यादरम्यानच भाजीभाकरे यांनी आपल्या आर्थिक अडचणीमुळे २०२१ मध्ये सदर जमीन कायदेशीररित्या स्रेहित बाबूलाल बाहेती यांना विक्री केली होती. या विक्रीवर चांडक यांनी बनावट कागदपत्रांआधारे हरकत घेवून जबरदस्तीने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाहोता. याप्रकरणी भाजीभाकरे कुटूंबाने न्यायालयात तक्रार दाखल करून बनावट कागदपत्रांचे पुरावे सादर केले होते.
जिल्हा दिवाणी न्यायालयाने भाजीभाकरे बंधूं व स्रेहित चांडक यांनी सादर केलेले पुरावे आणि बनावट कागदपत्रांची पडताळणी केली. या पडताळणीअंती चांडक यांनी केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. याआधारे जिल्हा न्यायालयाने गणेशलाल चांडक यांच्या विरोधात निकाल देवून सदर जमिनीत जाण्यास मज्जाव केलेला आहे. याप्रकरणी फिर्यादीकडून अॅड. व्यंकट नाईकवाडे यांनी बाजू मांडली आहे. या निकालानंतरही ३०जून २०२५ चांडक यांचा मुलगा नंदकिशोर चांडक यांनी आपल्या साथीदारांसह संबंधित क्षेत्रात जावून स्रेहित बाहेती व त्यांच्या परिवाराला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत येथील जमीन मशागत थांबविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्रेहित चांडक यांनी न्यायालयाच्या निकालाचा आधार घेवून मुरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत असून न्यायालयाचा अवमान आणि बेकायदेशिर वर्तन केल्याबद्दल चांडक कुटूंबाविरूध्द कारवाई करावी,अशी मागणी बाहेती परिवाराने केली आहे.