पानगावातील घटना : प्रकरण थेट न्यायालयात दाखल
लातूर/ 'आपण मैत्रेय कंपनीमध्ये पॉलिसी एजंट असल्याचे' सांगून एका 65 वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेने थेट न्यायालयातच धाव घेतली. या प्रकरणी साक्षी, पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अधिक वृत्त्त असे की, ताराबाई त्रिंबक कांबळे ही 65 वर्षीय महिला रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील रहिवाशी असून त्या अशिक्षित आहेत. मधुकर केरबा गालफाडे आणि त्यांची पत्नी संजीवनी मधुकर गालफाडे हे सुध्दा याच गावातील रहिवाशी आहेत. 'आपण मैत्रेय कंपनीत पॉलिसी एजंट असून आमच्याकडे पॉलिसी काढल्यास सहा वर्षात दाम दुप्पट करून देतो', असे सांगून मधुकर गालफाडे आणि संजीवनी गालफाडे या दाम्पत्याने ताराबाई त्र्यंबक कांबळे यांना पॉलिसी काढण्यासाठी गळ घातली. गालफाडे दाम्पत्य गावातीलच असल्याने ताराबाई यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत मधुकर गालफाडे यांच्याकडे सहा वर्षाची पॉलिसी काढली. ताराबाई यांनी मधुकर गालफाडे यांना 2011 साली 13700 रुपये भरले. त्यानंतर 2012 साली 12700 तर 2013 साली 11400 आणि 2014 साली 11400 तसेच 2015 साली 1140 तर 2016 साली 11400 रुपये पॉलीसिसाठी दिले. मात्र या रकमेची पावती मधुकर गालफाडे यांनी ताराबाईंना दिलीच नाही मात्र ते गावातीलच असल्याने ताराबाईंनी गालफाडे दाम्पत्यावर विश्वास ठेवला. सहा वर्ष उलटले, पॉलीसिची रक्कमही पूर्ण भरली. पण पॉलिसीचे पैसे परत मिळेनात. त्यामुळे ताराबाई यांनी मधुकर गालफाडे तसेच संजीवनी गालफाडे यांच्याकडे पॉलिसीच्या पैशाबाबत विचारणा केली. मात्र गालफाडे दाम्पत्य उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. ताराबाई यांनी अधिकच तगादा लावल्यानंतर गालफाडे दांपत्याने ताराबाईंनी अश्लील शिवीगाळ केली आणि पुन्हा पॉलिसीचे पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकीही दिली, असा आरोप ताराबाई यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी रेणापूर येथील पोलीस ठाण्यात मधुकर गालफाडे आणि संजीवनी गालफाडे यांच्या विरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे ताराबाई यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आणि घडला प्रकार न्यायालयासमोर मांडत गालफाडे दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करून आपले पैसे परत मिळावे अशी मागणी केली. सदर प्रकरणी साक्षी, पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.