बँकेचे लोन मिळवून देतो, घर बांधून देतो म्हणून फसवणूक करणारे आरोपींना पोलीसांकडून अटक.
विविध शासकीय विभागाचे बनावट शिक्के व कॉम्प्युटर जप्त.*
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, यातील फिर्यादीला त्याचे मालकी हक्काच्या जागेवर बांधकाम करणे असल्याने बँक लोनची आवश्यकता होती. याचा फायदा घेऊन बँकलोन मिळवून देतो व तुमच्या घराचे बांधकाम सुद्धा मीच करून देतो असे सांगून इसम नामे युसुफ जाफर शेख, राहणार वीरहनुमंतवाडी,लातूर. याने फिर्यादी कडून विविध कारणे सांगून 12 लाख 80 हजार रुपये घेतले परंतु अद्यापपावेतो घराचे बांधकाम करून दिले नाही.अशी फिर्याद दिल्याने पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 679/2021 कलम 420, 406, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अंबादास गळगट्टे हे करीत असताना गुन्ह्यातील आरोपी नामे
1) युसुफ जाफर शेख, राहणार वीरहनुमंतवाडी,लातूर. यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करून त्यांच्या खाजगी ऑफिसची झडती घेतली असता त्यांच्याकडून विविध शासकीय विभागांचे अनेक बनावट शिक्के तसेच बनावट दस्तऐवज तयार करण्याकरिता वापरण्यात आलेले कॉम्प्युटर, प्रिंटर, हार्डडिक्स जप्त करण्यात आली असून नमूद गुन्ह्यातील आरोपीला अटक करून मा.न्यायालयात हजर करण्यात आले. मा.न्यायालयाने दिनांक 27/10/2021 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.अंबादास गळगट्टे हे करीत आहेत.