खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले
लातूर/प्रतिनिधि
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,मार्च 2021 मध्ये पोलीस ठाणे मुरुड हद्दीमध्ये सावरगाव शिवारात अनैतिक संबंधाच्या कारणावरून खूनाची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे मुरुड येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, खुनाच्या घटनेपासून या प्रकरणातील प्रमुख आरोपी विकास हिंगे हा फरार झालेला होता, या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अगोदरच अटक केली होती परंतु विकास हिंगे हा सोलापूर, पुणे, मुंबई भागात पोलिसांची नजर चुकवून राहात होता.
पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी ,लातूर (ग्रामीण) प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात विविध गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्याची मोहीम सुरू असून या मोहिमेमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले ,प्रकाश भोसले , बालाजी जाधव, सिद्धेश्वर जाधव , सुधीर कोळसुरे व पोलीस ठाणे मुरुड येथील पोलीस अंमलदार सय्यद पोलिसांचे एक पथक तयार करून फरार आरोपीचा शोध घेत असताना नमूद आरोपी हा त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला आहे. अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला मिळाल्यावरून विकास हिंगे यास वरील टीमने लातूर येथून ताब्यात घेतले व मुरुड पोलीसध्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोणे हे करीत आहेत.
