लोदगा येथे निर्मित बांबूची खुर्ची गडकरी यांना भेट
लातूर/ प्रतिनिधी: फिनिक्स फाउंडेशन लोदगा व कॉनबॅकच्या वतीने लोदगा येथे बांबू पासून फर्निचर निर्मिती सुरू करण्यात आली असून या अंतर्गत तयार करण्यात आलेली पहिली बांबुची खुर्ची केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेट देण्यात आली.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे कॉनबॅक या संस्थेच्या वतीने बांबू पासून फर्निचर तयार केले जाते.कॉनबॅक व फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने आता लोदगा येथेही बांबूचे फर्निचर तयार केले जात आहे.यासाठी कुडाळ येथून प्रशिक्षित कर्मचारी लोदगा येथे आलेले आहेत.हे प्रशिक्षित कर्मचारी व स्थानिक कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून फर्निचर तयार होत आहे.
शनिवारी (दि.६ मार्च )
लोदगा येथे तयार झालेली बांबूची पहिली खुर्ची केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेट देण्यात आली.फिनिक्स फाउंडेशनचे प्रमुख पाशा पटेल व कॉनबॅकचे प्रमुख संजीव करपे यांनी गडकरी यांची निवासस्थानी भेट घेत त्यांना खुर्ची भेट दिली.संपूर्ण प्रकल्पाची माहिती त्यांना देण्यात आली.
गडकरी यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.कोकणाबाहेर पहिल्यांदाच असा प्रकल्प उभा राहत असल्याबद्दल त्यांनी पाशा पटेल व संजीव करपे यांचे अभिनंदन करून शुभेच्छाही दिल्या.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तुंचा वापर वाढण्याची गरज असून आपण यासाठी पुढाकार घेणार आहोत.
इतरांनीही बांबुचे फर्निचर व साहित्य वापरावे यासाठी प्रेरित करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
आगामी महिनाभरात लोदगा येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार असल्याची माहिती पाशा पटेल यांनी गडकरी यांना दिली.

