सिद्धेश्वर यात्रा महोत्सवात केवळ धार्मिक विधी होणार
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण
लातूर /प्रतिनिधी: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सिद्धेश्वर यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी होणारे पारंपारिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.पाच दिवस हे
कार्यक्रम होणार असून बुधवारपासूनच मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
दरवर्षी महाशिवरात्री निमित्त श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव संपन्न होतो. जवळपास १५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लातूरसह मराठवाड्यातून भक्त दर्शनासाठी व यात्रेचा आनंद घेण्यासाठी येत असतात.परंतु यावर्षी कोरोना विषयक निर्बंधांमुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (दि.१० मार्च )रात्री १२ वाजता गवळी समाजाचा दुग्धाभिषेक होणार आहे. यासाठी केवळ ५ जणांना परवानगी देण्यात आली आहे.परंपरेप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी माळी समाजाच्या वतीने पुष्पाभिषेक होणार आहे.सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते मंदिर परिसरात ध्वजारोहण होणार आहे.विश्वस्त मंडळींचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.
दरवर्षी मानाच्या काठ्या व झेंडा मिरवणूक काढली जाते.गौरीशंकर मंदिरापासून ही मिरवणूक निघते.परंतु यावर्षी मंदिर परिसरातच ही मिरवणूक काढण्यात येणार असून मानकऱ्यांच्या हस्ते काठ्यांचे पूजन केले जाणार आहे.
यात्रा कालावधीत दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे.या कालावधीत केवळ नित्योपचार व पारंपारिक धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.यावर्षीचा यात्रा महोत्सव दिनांक ११ ते १५ मार्च या कालावधीत होणार आहे.दररोज सकाळी होणाऱ्या काकड्यासाठी ५ व हरिपाठासाठी केवळ ११ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.कीर्तन सेवा बंद असून रात्री ७ ते ९ या कालावधीत संगीत भजन संपन्न होणार आहे.दि.१३ मार्च रोजी लिंगायत समाजाच्या मानाच्या काठीचे पूजन होणार आहे.दि.१५ मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.
यात्रा महोत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित केली जाणारी कुस्ती स्पर्धा,पशु व कृषी प्रदर्शन,चर्चासत्र,भजन स्पर्धा व रुद्राभिषेक यावर्षी रद्द करण्यात आले आहेत. भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात न येता श्रींचे ऑनलाईन दर्शन घ्यावे,देवस्थानला सहकार्य करावे,असे आवाहन देवस्थानच्या प्रशासक श्रीमती यु.एस.पाटील यांनी केले आहे.

