लातूर आयमॅथॉन स्पर्धेत उत्तम प्रतिसाद फिट लातूर साठी धावले लातूरकर
ना.बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ
लाातूरदि.(प्रतिनिधी): इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ( आय एम ए ) लातूर शाखेच्या वतीने आयोजित आयमॅथॉन (मॅरेथॉन ) स्पर्धेत चांगला प्रतिसाद मिळाला. गुलाबी थंडीत आरोग्यासाठी फिट राहण्याचा संदेश देण्यासाठी हजारो लातूरकर स्त्रीपुरुष , आबालवृद्ध धावले . नेटक्या आयोजनामुळे स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल!
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी हिरवी झेंडी दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ केला. रविवारी सकाळी कस्तुराई मंगल कार्यालया समोरील बायपास रोडवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.३ किलोमीटर, ५ किलोमीटर व १० किलोमीटर अशा तीन प्रकारात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी जवळपास एक हजार स्पर्धकांना संयोजक व प्रायोजकांच्या वतीने टी-शर्ट आणि पदक देऊन तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
आय एम ए या संघटनेच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचे हे दुसरे वर्ष .राज्यात ठाणे शहरा नंतर लातूर शहरात अशी स्पर्धा आयोजित करण्यात येते .कोरोना विषाणू संसर्गामुळे महिनोंमहिने घरात बसून असलेल्या स्त्री-पुरुष , आबालवृद्धांनी या स्पर्धेच्या निमित्ताने गुलाबी थंडीत रस्त्यावर उतरून मोकळा श्वास घेतला .केवळ स्पर्धक नव्हे तर अनेक स्त्री-पुरुष डॉक्टरांनीही स्पर्धेत सहभाग नोंदवत लातूरकरांना फिट राहण्याचा संदेश दिला , आणि स्पर्धकांचा उत्साह वाढला. तसेच पारितोषिकांची ही लयलूट केली. स्पर्धास्थळी आनंदी व उत्साही वातावरण राहावे यासाठी संयोजकांच्या वतीने नेटके आयोजन करण्यात आले होते. डॉल्बी म्युझिकच्या संगतीत वार्म अपसाठी झुंबा , ढोल ताशे , सेल्फी पॉइंट आणि संगीताच्या तालावर थिरकणारे डॉक्टर्स , स्पर्धक यामुळे या मॅरेथॉन स्पर्धेत खऱ्या अर्थाने रंगत आली होती .
प्रारंभी बरोबर सकाळी साडेसहा वाजता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी हिरवी झेंडी दाखवताच दहा किलोमीटर अंतरावरसाठी स्त्री-पुरुष स्पर्धक धावले .यानंतर पाच किलोमीटर व तीन किलोमीटर अंतरासाठी स्पर्धक धावले. टाळ्या वाजून, हवेत फुगे सोडून लातूरकरांनी स्पर्धकांना प्रोत्साहित केले. स्पर्धकांचे पालक , नातेवाईक, संयोजन समितीचे पदाधिकारी , पोलीस, प्रशासन आणि लातूरकर नागरिकांनी स्पर्धास्थळी गर्दी केली होती . कस्तुराई मंगल कार्यालयापासून व्हाया पीव्हीआर चौक, ग्रँड हॉटेल बायपास रोड व परत स्पर्धास्थळ असा या स्पर्धेचा मार्ग होता.
मानसिक व शारीरिक आरोग्य फिट ठेवा असे त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सांगून उपयोग नाही तर आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे लातुरातील स्त्री-पुरुष व ज्येष्ठ डॉक्टरांनी रस्त्यावर उतरत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवला . कधी प्रेमळपणे तर प्रसंगी कठोर शब्दात रुग्णांना कडू औषधीची मात्रा देत , इंजेक्शन टोचणारे आणि गंभीर वाटणारे डॉक्टर या स्पर्धेच्या निमित्ताने डॉल्बी सिस्टीमवरील संगीताच्या तालावर झुंबा करीत थिरकताना दिसून आले .यामुळे स्पर्धास्थळी उत्साहाचे व आनंदी वातावरण पाहावयास मिळाले. लातुरातील मधुमेह तज्ञ डॉ.अष्टेकर यांनी एक वर्षापूर्वी डॉक्टरांच्या व प्रायोजकांच्या सहकार्यातून मॅरॅथॉन स्पर्धा सुरू केलीहोती. नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या रविवारी ही दुसरी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
प्रमुख उपस्थिती व डॉक्टरांचा सहभाग
यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे , हिम्मतराव जाधव , राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे , मनपा आयुक्त अमन मित्तल, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मणरावदेशमुख.भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे , प्रायोजक प्रवीण मुंदडा , अक्षय मुंदडा, संजय मुंदडा, आय एम ए चे जिल्हाध्यक्ष डॉ.विश्वास कुलकर्णी , सचिव डॉ.चांद पटेल , वुमन्स विंगच्या जिल्हाध्यक्षा डॉ. अनुजा कुलकर्णी , सचिव डॉ. रचना जाजू, संयोजन समितीचे सचिव डॉ. अजय जाधव , डॉ. वैशाली टेकाळे , डॉ.आरती झंवर, डॉ. कांचन जाधव, डॉ. अय्याज शेख , डॉ.संतोष डोपे , ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती .
डॉ. सरिता मंत्री, डॉ. सुरेखा काळे, डॉ. अशोक गानू ,डॉ.मोहिनी गाणू ,डॉ. ब्रिजमोहन झंवर ,डॉ. अशोक पोतदार , डॉ. राजेश पाटील , डॉ.दिनेश वर्मा , डॉ.रमेश भराटे , डॉ.राजेश दराडे , डॉ.विठ्ठल लहाने , डॉ.हंसराज बाहेती , आदी डॉक्टरांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवत स्पर्धकांचा उत्साह वाढवला . .नियमितपणे विविध स्पर्धेत सहभागी होणारे धावपटू अभिजित देशमुख , प्रसाद उदगीरकर, डॉ. ब्रिजमोहन झंवर. योगेश करवा यांच्यासह अनेकजण या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले .


