आनदूर बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा-सौ. स्वाती जाधव पाटील
लातूर/प्रतिनिधी:तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करण्यात आला.हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.सरकारी वकील म्हणून ॲड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि गुन्हेगारांना कठोर शासन करावे,अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.स्वाती जाधव-पाटील यांनी केली आहे.
अणदूर येथे दि.२७ जानेवारी रोजी नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर सागर घोडके,आनंद घोडके व आणखी एकाने पाशवी बलात्कार केला.ही मुलगी मैत्रिणीकडे जात असताना तिला सागर घोडके याच्या घरात नेऊन तिघांनी हे पाशवी कृत्य केले. सायंकाळपर्यंत मुलगी घरी न आल्याने याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी व मामाने नळदुर्ग पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले.
बलात्कार करणारे आरोपी शिवसेना व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मुले आहेत. उस्मानाबाद जिल्हा आणि राज्यातही असे प्रकार वारंवार घडत आहेत.सास्तुर येथेही अशीच घटना घडली होती. परंतु सरकार झोपेचे सोंग घेत आहे.राज्यात८ वर्षापासून ८०वर्ष वयाच्या स्त्रीवर बलात्कार होत आहेत.तरीही शासन कारवाई करत नसल्याचे त्या म्हणाल्या.
पीडित मुलगी व तिच्या आई-वडिलांची आपण भेट घेतली आहे.भाजपा पिडीतेच्या सोबत आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पीडितेच्या वडिलांशी भ्रमणध्वनीवरून बोलले आहेत.महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
या प्रकरणी आपण राज्यपाल,मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देणार आहोत.आ.राणादादा पाटील हेदेखील प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.पक्षाचे कार्यकर्ते अन्याय-अत्याचार करत असताना मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावे.शक्ती कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी.हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.सरकारी वकील म्हणून ॲड.उज्वल निकम यांची नेमणूक करावी,अशी मागणीही पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी गरड,सरचिटणीस वृषाली दंडनाईक,जोशीलाताई लोमटे,दमयंतीताई वाखुरे,लतिकाताई पेठे,धनश्रीताई ताड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
