असा ही एक वाढदिवस.....
पत्नी आणि भावाने केले रक्तदान भोसले कुटूंबियांचा स्तुत्य निर्णय!!!!
लातूर-सतीश तांदळे
लातूर शहरात वास्तव्यास असलेले विशाल भोसले यांचा वाढदिवस त्यांच्या पत्नी आणि भावाने रक्तदान करून साजरा केला विशेष म्हणजे वडील विजयकुमार भोसले आणि आई सुरेखा भोसले यांनीही रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र मधुमेह, थायरॉईडचे उपचार सुरू असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. भोसले कुटुंबीयांनी साजरा केलेल्या या अनोख्या वाढदिवसाची चर्चा मात्र दिवसभर समाजमाध्यमावर होताना दिसून आली.
विशाल भोसले हे रत्नागिरी येथील एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. लातूर शहरात त्यांचे घर असून आई, वडील आणि पत्नीसह आपला वाढदिवस साजरा करण्याचे विशालने ठरवले. आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस विशेष करण्याच्या उद्देशाने विजयकुमार भोसले यांनी यादिवशी रक्तदान करण्याचा संकल्प केला याला त्यांच्या पत्नी सौ सुरेखा आणि सून शितल, पुतण्या चंद्रशेखर यांनीही सहमती दर्शविली. क्षणाचाही विलंब न करता भोसले यांनी कुटुंबियांसह थेट शहरातील माऊली रक्तसंकलन केंद्र गाठले त्या ठिकाणी विशालच्या पत्नी शितल भोसले, चुलत भाऊ चंद्रशेखर भोसले यांनी रक्तदानही केले मात्र विजयकुमार आणि त्यांच्या पत्नी मधुमेह, थायरॉईडने ग्रस्त असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही.
माऊली रक्तसंकलन केंद्राच्या वतीने डॉ सितम सोनवणे यांनी भोसले कुटूंबियांचा यथोचित सन्मान करून त्यांना प्रमाणपत्र बहाल केले.
रक्तदानाचा संकल्प आणि तो यशस्वीरीत्या पूर्ण करून भोसले कुटुंबीयांनी विशाल यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने विशाल करून स्तुत्य, अनुकरणीय सामाजिक बांधिलकी जपली.


