मनपाच्या वतीने तीन स्वॅब तपासणी केंद्र कार्यान्वित
लातूर/प्रतिनिधी: हिवाळा तसेच दीपावली नंतरच्या कालावधीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने महानगरपालिकेच्या वतीने लातूर शहरात नव्याने तीन स्वॅब तपासणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत.
दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून राज्य शासनाकडून तपासण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लातूर शहरात सध्या एकच तपासणी केंद्र चालू आहे. महापालिकेला दररोज ११५० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.हायरिस्क रुग्णांची तपासणी व्हावी तसेच चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे या उद्देशाने पालिकेच्या वतीने अधिक रुग्ण असणाऱ्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरात स्वॅब तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
मनपा कार्यालयात समाज कल्याण विभाग,गौतम नगरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व पटेल चौकातील नागरी आरोग्य केंद्रात ही केंद्र दररोज सकाळी १० ते १ या कालावधीत सुरू राहणार आहेत.तीनही केंद्रांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अनुक्रमे गजानन पाटील,स्वप्निल जाधव व वजेद सय्यद तर नोडल अधिकारी म्हणून डॉ.शेख मुक्तदीर, डॉ.एम.जे.जाधव आणि डॉ.व्ही.बी.काळदाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या केंद्रात तपासण्या सुरू असून गरजेनुसार रुग्णांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.