मनपाकडून पार्कींगच्या नावाखाली शेतकर्याची लूट-भाजपा युमोचा पुढाकार
मनपाने लक्ष देवून न्याय देण्याची मागणी
लातूर दि.12/12/2020
लातूर येथील महानगरपालिकेकडून शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी अवैध पार्किंग करणार्या नागरिकांच्या वाहनांना जामर लावून दंडाची वसूली करण्याचे काम सक्तीने केले जात आहे. हे काम मनपा कर्मचारी करीत नाहीत. तर याचे कंत्राट एका शहरातील व्यक्तीला देण्यात आलेले आहे. परंतु त्या व्यक्तीकडून रितसर प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे गुळमार्केट परिसरात कामासाठी येणार्या शेतकरी बांधव व सर्वसामान्य नगरिकांना दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत भाजपा युवा मोर्च्यातर्फे लातूर महानगरपलिकेेला निवेदन देवूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण दंडाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
लातूर महानगरपालिकेने पोलिस प्रशासनाची मदत घेवून शहर वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे असते. परंतु मनपाच्या निष्क्रियपणामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे शक्त होत नाही. परिणामी शहरात जागोजागी वाहतुकीचा बेशिस्तपणा समोर येत आहे. यावर तोडगा म्हणून लातूर महानगरपालिकेने शहरातील बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी खाजगी कंत्राटदाराला दिली असल्यामुळे कंत्राटदाराकडून पार्किंगला शिस्त लावण्याऐवजी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचे काम केले जात आहे. हा प्रकार भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनाही शुक्रवारी आढळून आला. त्यांनी वाहन टोईंग करणार्या व्यक्तिला जाबही विचारला परंतु त्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. उलट महानगरपालिकेचा बेशिस्तपणा सर्वसामान्य नागरिक व शेतकरी बांधवासमोर आलेला आहे. याबाबत लातूर महानगरपालिकेकडे अनेक वेळा निवेदन देऊनही ही लूट थांबत नसल्यामुळे लातूर महानगरपालिकेचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे अजय कोटलवार, महादेव पिटले, ओम राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.