टोईंग लाऊन त्यांच्याकडून सक्तीची वसुली करण्यात येत आहे याविरोधात शनिवारी व्यापार्यांचा बंद
शहर जिल्हा भाजपाचा व्यापार्यांना पाठिंबा
लातूर/प्रतिनिधी ः- शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि बाजारपेठेत गर्दी होऊ नये यासाठी शहर मनपाच्या वतीने बाजारपेठेत विविध ठिकाणी बॅरीकेट्स लावण्यात आली आहे. तसेच बेशिस्त पार्किंग करणार्या वाहन धारकांच्या वाहनांना टोईंग लाऊन त्यांच्याकडून सक्तीची वसुली करण्यात येत आहे. याचा परिणाम व्यापारावर होऊ लागलेला असून याबाबत मनपाला विविध व्यापारी संघटनांनी व भाजपाने वेळोवेळी निवेदन सुद्धा दिलेले आहे. मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने शनिवारी शहरातील व्यापार्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. या बंदला शहर जिल्हा भाजपाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.
शहर महानगरपालिकेच्या वतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वेळोवेळी अनेक उपाययोजना केल्या आहेत. या योजनेअंतर्गतच शहरातील बेशिस्त वाहन पार्किंग करणार्या वाहनांना टोईंग लाऊन त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात येत आहे. यासाठी मनपाने खाजगी कंत्राटदारास निविदा दिलेली आहे. मात्र या खाजगी कंत्राटदार मनमानी करीत असून वाहन धारकांकडून सक्तीची वसुली करण्यासह त्यांच्यासोबत हुज्जत घालण्याचे प्रकार सुद्धा सातत्याने करत आहेत. तसेच बाजारपेठेत गर्दी होऊन नये म्हणून विविध ठिकाणी बॅरीकेट्स लावून वाहनाची वर्दळ थांबविण्यात आली आहे. वाहनधारकांकडून होणारी सक्तीची वसुली तसेच वाहनांची वर्दळ थांबविण्यासाठी करण्यात आलेले बॅरीकेट्स याचा परिणाम व्यापारावर होऊ लागला आहे. आधीच कोवीड आणि त्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळेच व्यापार्यांनी यापुर्वी बाजारपेठेत बसविण्यात आलेले बॅरीकेट्स आणि वाहनधारकांकडून होणारी पार्किंगची टोईंग वसुली तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी मनपाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या प्रकरणी शहर जिल्हा भाजपाने अध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात आंदोलन करुन मनपा आयुक्तांना निवेदन दिलेले होते.
मात्र अद्यापपर्यंत मनपा प्रशासनाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळेच शहरातील व्यापार्यांनी आता शनिवारी या प्रकरणी बंद पाळण्यात येणार असल्याचे निवेदन मनपा आयुक्तांना दिलेले आहे. या बंदमध्ये सराफा असोसिएशन, किराणा असोसिएशन, भांडी असोसिएशन, कापड दुकानदार असोसिएशन, मशिनरी दुकानदार असोसिएशन आदिंचा सहभाग असणार आहे. शहर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी याबाबत मनपा आयुक्तांना पत्र देऊन व्यापार्यांनी मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात जो बंद पाळण्याचा निर्धार केला आहे त्यास पाठिंबा असल्याचे सांगून शनिवारच्या आत याबाबत मनपाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
