रुग्णसेवा सदनची उभारणी गतिमान
लोकसहभागातील प्रकल्पासाठी दानशुरांनी पुढे यावे
-डॉ.कैलास शर्मा
लातूर/प्रतिनिधी:विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात येत असलेल्या रुग्णसेवा सदनचे बांधकाम गतीने सुरू आहे.हा संपूर्ण प्रकल्प लोकसहभागातून उभारला जात असून त्यासाठी दानशुरांनी पुढे येण्याचे आवाहन मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे शैक्षणिक संचालक डॉ.कैलास शर्मा यांनी केले.
रुग्णसेवा सदनच्या उभारणी संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.शर्मा बोलत होते.या पत्रपरिषदेस प्रकल्प समन्वयक पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका,रुग्णालयाचे सहकार्यवाह अनिल अंधोरीकर,रुग्णसेवा सदन समितीचे प्रकल्प अध्यक्ष बी.बी.
ठोंबरे, सहसचिव शिवदास मिटकरी,सदस्य ॲड.मनोहरराव गोमारे,मकरंद जाधव,प्रकल्प बांधकाम समन्वयक अतुल ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माहिती देताना डॉ.कैलास शर्मा म्हणाले की,उभारल्या जाणाऱ्या रुग्णसेवा सदनमध्ये १५० रुग्ण व प्रत्येकी एका नातेवाईकाची सोय केली जाणार आहे.त्यासाठी जवळपास नऊ ते दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी पावणेदोन कोटी रुपये देणगी जमा झाली आहे.ती आजवरच्या कामावर खर्च करण्यात आली आहे.हा प्रकल्प पुढील एक ते दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
या सदनात रुग्णांना राहणे,जेवण तसेच सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.निवासी डॉक्टरांची राहण्याची सोयही याच सदनात केली जाणार आहे.सदनाच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष दिले जाणार असून प्रत्येक खोलीत टेलिफोन,टीव्ही अशा सुविधा असणार आहेत.रुग्ण आणि नातेवाईकांच्या भोजनासाठी विशेष व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रफितीच्या माध्यमातून प्रकल्पाची माहिती देताना शिवदास मिटकरी यांनी सांगितले की,या प्रकल्पाअंतर्गत ८० हजार चौरस फूट बांधकाम होणार आहे. तीन मजल्यांच्या बांधकामात ३६ स्पेशल रूम,२४ जनरल रूम,१२ डॉर्मिटरी असणार आहेत.५ लाख रुपये देणगी देणाऱ्या दानशूराचे नाव एका खोलीला दिले जाणार आहे.११लाख रुपये देणगी दिल्यास डॉर्मिटरी तर २५ लाख रुपये देणाऱ्या दानशुराचे नाव कॉन्फरन्स हॉलला दिले जाणार आहे.३०लाख रुपयांची देणगी दिली असता किचन व डायनिंग हॉलला नाव दिले जाईल.डॉ.
कैलास शर्मा यांच्या माध्यमातून एक कोटीपेक्षा अधिक देणगी प्राप्त झाली असून देणगीदारांना आयकरातून सवलत मिळणार असल्याचे ते म्हणाले.
पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका यांनी सांगितले की, आज उच्च मध्यमवर्गीयांनाही आजारावरील उपचाराचा खर्च परवडत नाही.रुग्ण व नातेवाईकांचा त्रास कमी करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात असल्याचे ते म्हणाले.
लातुरात अशा प्रकल्पाची गरज असल्याचे डॉ कैलासजी शर्मा यांनी सुचवले व जलयुक्त लातूरच्या टीमने हा प्रकल्प लोकसहभागातून पूर्ण करण्याचा संकल्प केला असे मत बी.बी.ठोंबरे यांनी व्यक्त केले.३१ मार्चपर्यंत पहिला मजला पूर्ण करून तो उपयोगात आणण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या त्याच परिसरात छोट्या इमारतीत ११ रुग्ण व प्रत्येकी १ नातेवाईक यांची निवास व भोजन व्यवस्था केवळ १०० रुपयात केली जात असून दैनंदिन OPD साठी येणाऱ्या रुग्णांनाही दुपारचे भोजन मोफत दिले जात आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
रुग्णसेवा सदनाशी पत्रकारांचे ऋणानुबंध ....
लातूरात उभारल्या जात असलेल्या या रुग्णसेवा सदनाशी पत्रकारांचेही कसे ऋणानुबंध आहेत याची आठवण कुकडे काकांनी यावेळी सांगितली. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत मिटकरी यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने हे रुग्णसेवा सदन उभे राहत आहे.जवळपास पावणेतीन वर्ष मिटकरी विवेकानंद रुग्णालयात होते. आपल्या सर्व संपत्तीच्या विक्रीतून आलेली रक्कम त्यांनी रुग्णालयाला दान केली.त्या निधीतून रुग्णसेवा सदनसाठी MIDC कडून २ एकर जागा घेतली.त्याचा उल्लेख असलेला फलक रुग्णसेवा सदनच्या जागेवर लावण्यात आला आहे.रुग्ण आणि नातेवाईकांना उपचारादरम्यान सुविधा मिळाव्यात हा त्यांचा यामागचा उद्देश होता.त्यामुळेच या रुग्णसेवा सदनाशी पत्रकारांचेही ऋणानुबंध जुळलेले असल्याचे त्यांनी सांगितले


