ऑफिसर्स क्लबचे काम वेगाने पूर्ण करा- जिल्हाधिकारी पृथ्वीराज
लातूर, दि. 19 ( प्रतिनिधी ) – लातूर ऑफिसर्स क्लबच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करून ते तात्काळ कार्यान्वित करावे, अशा सूचना क्लबचे अध्यक्ष तथा नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी शुक्रवारी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत दिल्या. यावेळी क्लबचे संस्थापक अध्यक्ष जी. श्रीकांत, उपाध्यक्ष तथा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, कोषाध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
लातूरमध्ये सर्वसोयींनीयुक्त क्लब असावे हे स्वप्न उराशी बाळगून जी. श्रीकांत यांनी आपल्या कार्यकाळात या क्लबची पायाभरणी केली होती. गेल्या दीड-पावणेदोन वर्षात क्लबच्या इमारतीचे काम वेगाने सुरू होते. अंतिम टप्प्यात असलेल्या या क्लबच्या उभारणीचा आढावा घेण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि क्लबचे संस्थापक अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी क्लबच्या ईमारतीला भेट दिली. कंत्राटदार माहेश्वरी आणि आर्किटेक्चर कृष्णकुमार बांगड यांनी दोघांनाही कामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. सर्व कामांची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जी. श्रीकांत आणि पृथ्वीराज बी. पी. या दोघांनीही कंत्राटदारांना वेगाने काम पूर्ण करण्याची सूचना केली. यावेळी श्री. पृथ्वीराज म्हणाले की देशातील सर्वच मोठ्या शहरात क्लब असतात. लातूरसारख्या शहरातही असे क्लब आकाराला येत आहे हे पाहून आनंद वाटला. येथे निर्माण होत असलेल्या सोयी आणि सर्वच खेळांची उपलब्धतता पाहता लातूरकरांनी मोठ्या प्रमाणात क्लबचे सदस्यत्व घेतले पाहिजे. अधिकाऱ्यांनीही क्लबचे सदस्यत्व स्विकारून आपल्याला फीट ठेवण्यासाठीचे पाऊल उचलले पाहिजे. क्लबच्या उभारणीपासूनची माहिती आपण घेतली. जी. श्रीकांत यांच्याप्रमाणेच आपणही क्लबच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार आहोत. इमारतीचे काम वेगाने पूर्ण करून हा क्लब एका दिमाखदार कार्यक्रमाने कार्यान्वित केला जाईल. लातूरकरांनी निश्चिंत होऊन क्लबचे सदस्यत्व स्विकारावे, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. पोलिस अधीक्षक तथा क्लबचे उपाध्यक्ष निखील पिंगळे यांनीही आपण या क्लबच्या कामात वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे सांगत क्लबचे महत्व विशद केले. केवळ पोलिसींग करणे हे पोलिसांचे काम नसून समाजातील धुरीणांशी सौहार्दाचे संबंध निर्माण करणेही गरजेचे असते. ते काम क्लबच्या माध्यमातून होऊ शकते यावर आपला विश्वास असल्याचे श्री. पिंगळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बी. बी. ठोंबरे, सचिन बंडापल्ले, दिनेश इनानी, तुकाराम पाटील, किर्ती भुतडा, हेमंत वैद्य, नितीन नावंदर, दिलीप माने, सुरशेटवार असे क्लबच्या कार्यकारी समिती, बांधकाम समिती, मेंम्बरशीप समिती अशा सर्वच समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
०००००००००
लातूरकर म्हणून मी क्लबचा कायम सदस्य- जी. श्रीकांत
लातूरमध्ये मला सर्व सोयींनीयुक्त क्लबची पायाभरणी करता आली याचा मनस्वी आनंद आहे. जिल्हाधिकारी या नात्याने मी पदसिद्ध अध्यक्ष होतो. परंतू सर्वांच्या आग्रहापोटी एक लातूरकर म्हणून मी या क्लबचे कायम सदस्यत्व स्विकारले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज किंवा वैयक्तिक गाठीभेटीसाठी मी जेंव्हा कधी लातूरला येईन तेंव्हा लातूर ऑफिसर्स क्लब मध्येच थांबणार आहे. मी या क्लबचा पाया रचला असला तरी नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. हे या क्लबवर वैभवाचा कळस चढवतील, असे जी. श्रीकांत यांनी यावेळी सांगितले.

