Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

समाजहिताचे कार्य करणाऱ्या संस्थांचे मार्ग प्रशस्त व्हावे- भैय्याजी जोशी

 समाजहिताचे कार्य करणाऱ्या संस्थांचे मार्ग प्रशस्त व्हावे- भैय्याजी जोशी





लातूर/प्रतिनिधी:समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शन नको तर प्रोत्साहन हवे आहे.प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती हिशोबी असू नयेत.अशा कार्यात मार्गदर्शनापेक्षा मार्ग प्रशस्त करण्याचे काम करायला हवे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
      स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या रौप्य महोत्सवाचे उद्घाटन करताना भैयाजी जोशी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद मेडिकल फाउंडेशन व रिसर्च संस्थेच्या डॉ.ज्योत्स्नाताई कुकडे तर व्यासपीठावर स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.स्मिताताई परचुरे यांची उपस्थिती होती. लोकसभेचा माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यादेखील व्हर्च्युअली या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या.  
     यावेळी बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की,सत्ता व स्वयंसेवी संस्थांचा समन्वय असायला हवा.मिळून काम करण्याची इच्छा हवी.देशात स्वयंसेवी संस्थांचे जाळे मोठे असून त्यांचे कामच ऊर्जा व प्रेरणा देणारे असते.स्वयंसिद्धा महिला मंडळ ही त्यातीलच एक संस्था आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी संवेदना हवी असते.काहीवेळा संस्थांच्या कामाबाबत शंका घेतली जाते. परंतु विवेकानंद रुग्णालय, स्वयंसिद्धा महिला मंडळ,जनकल्याण समिती यासारख्या संस्थांची कामे त्या शंका दूर करण्याचे काम करत राहतात.
   स्वतःच्या कार्यातून संस्थेची उंची वाढली पाहिजे. त्यासाठी संवेदना व कर्तव्य भावना असावी लागते.शासनाच्या चांगल्या योजना चांगल्या संस्थांच्या हाती जाणे आवश्यक आहे. योजनेत कमतरता असेल आणि ती योजना चांगल्या संस्थेच्या हातात गेली तर योजनेचेही महत्त्व वाढते. समजूतदारपणा,संवेदना,समर्पण संस्कार आणि सेवा हे मातृशक्तीला मिळालेले वरदान आहे.याचा विचार करून स्त्री शक्तीचा वापर केला तर बदल घडतो. स्वयंसिद्धा महिला मंडळ त्याच मार्गावर वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.
   अशा स्वयंसेवी संस्थांना मदतीपेक्षा प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यातून आपोआप मदत होते. मन आणि अंत:करणातून प्रोत्साहन असायला हवे. कामाच्या गुणवत्तेनुसार साधने उपलब्ध होतात.त्यामुळे मार्गदर्शन करण्यापेक्षा मार्ग प्रशस्त करण्याचे काम झाले पाहिजे. समाजानेही महिलांचा सन्मान करण्यापेक्षा त्यांची सहभागिता वाढवली पाहिजे. भारतीय समाजजीवन परस्परावलंबी आहे. समाजातील सर्व घटकांची शक्ती ओळखून ती वाढवण्याचे काम झाले पाहिजे. स्वयंसिद्धा महिला मंडळाची आजवरची भूमिका पाहता त्यांच्यापासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी असे भैय्याजी जोशी म्हणाले.
     ऑनलाइन मार्गदर्शन करताना सुमित्राताई महाजन यांनी स्त्रियांनी स्वतः जागृत होणे आवश्यक असल्याचे मत मांडले. आज त्याची गरज आहे. स्त्रियांमध्ये निर्णयक्षमता आहे, तिचा वापर झाला पाहिजे. कुटुंब, समाज आणि देशासाठी मी सुद्धा काहीतरी करू शकते हा स्त्रीचा विचार आहे. स्त्रियांचे स्वत्व जागृत करणे हेच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण आहे,असे त्या म्हणाल्या.
    सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती अंबादासराव जोशी यांनी सामाजिक कार्यात सहज सहभाग असावा ही भारतीय मानसिकता असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना कुकडे काकुंनी स्वयंसिद्धा महिला मंडळाची सामाजिक कार्याची प्रेरणा कसदार असल्याचे सांगून स्वार्थी हेतूच्या संस्थांनी अनुदानाचा गैरफायदा घेतल्याचे मत व्यक्त केले.
    प्रारंभी स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खा. सुधाकरराव शृंगारे, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, न्यायमूर्ती अंबादासराव जोशी, उद्योजक हुकूमचंद कलंत्री यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या उपाध्यक्ष प्रेरणाताई रेड्डी, सौ कुकडे काकू व भैय्याजी जोशी यांनी त्यांना सन्मानित केले.
   मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. सौ स्मिताताई परचुरे, सुनीताताई नावंदर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्त्रियांचा मोडलेला कणा ताठ करण्याचे काम महत्त्वाचे मानत घेतलेला वसा न टाकता स्वयंसिद्धा महिला मंडळाचे कार्य आजवर चालत आले असल्याचे सौ स्मिताताई परचुरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. स्त्रियांचे दुःख दूर करण्याचे काम आम्ही निरलसपणे करत आहोत.आजवर मोडलेले ७५०० संसार आम्ही जोडले असल्याचे त्या म्हणाल्या.सौ.कुमुदिनी भार्गव यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. अप्पाराव कुलकर्णी यांचा श्लोकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गोकुळ बालसदनच्या मुलींनी छान नृत्य सादर केले.
   या कार्यक्रमास पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. रमेशअप्पा कराड, आ.
अभिमन्यु पवार,जि प अध्यक्ष राहुल केंद्रे,उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, सभापती रोहिदास वाघमारे, माजी आमदार  सुधाकर भालेराव, शिवाजीराव पाटील कव्हेकर, पालिकेतील गटनेते शैलेश गोजमगुंडे ,भाजपा शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. चिन्मय पूर्णपात्रे हिच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post