चंद्रकांत बिराजदार यांचे स्थायी समिती सदस्यत्व रद्द उच्च न्यायालयाच्या निकालाने काँग्रेसला झटका
लातूर,प्रतिनिधी : भाजपाशी बंडखोरी करत काँग्रेस सोबत हातमिळविणी करत चंद्रकांत बिराजदार यांनी उपमहापौर पद मिळविले आहे. हेच चंद्रकांत बिराजदार भाजपाच्या कोट्यातून स्थायी समिती सदस्य झाले होते. मात्र महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत चंद्रकांत बिराजदार यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम ठेवण्यात आले होते. या प्रकरणी भाजपा सदस्य तथा स्थायी समिती सभापती अॅड. दिपक मठपती यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे एैकुण घेतल्यानंतर चंद्रकांत बिराजदार यांचे स्थायी समिती सदस्यत्व रद्द केलेले आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलेला असून, आता लवकरच चंद्रकांत बिराजदार यांच्या जागी भाजपाच्या एका सदस्याला संधी मिळणार आहे.
लातूर महानगरपालिकेच्या दुसर्या पंचवार्षीक निवडणूकीत भाजपाच्या वतीने चंद्रकांत बिराजदार हे मनपा सभागृहात पोंहचले होते. पहिला अडिचवर्षाच्या कार्यकाळानंतर झालेल्या महापौर पदाच्या निवडणूकीत चंद्रकांत बिराजदार यांनी भाजपासोबत बंडखोरी केली. या निवडणूकीत चंद्रकांत बिराजदार यांनी काँग्रेससोबत हातमिळविणी करून उपमहापौरपद प्राप्त केले आहे. तत्पूर्वी भाजपाच्याच कोट्यातून स्थायी समितीमध्ये चंद्रकांत बिराजदार यांना संधी देण्यात आलेली होती. मात्र भाजपाशी बंडखोरी केल्यानंतरही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत चंद्रकांत बिराजदार यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आलेला होता.
सदर निर्णय बेकायदेशीर असल्याने भाजपा सदस्य तथा स्थायी समिती सभापती अॅड. दिपक मठपती यांनी माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी व सध्याचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्या सुचनेवरून उच्च न्यायालयात याचिका (2769/2020) दाखल केलेली होती. सदर याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेत याबाबत सुनावणी घेतली. या प्रकरणी अॅड. मठपती यांच्या वतीने अॅड. अमित याडकीकर,अॅड शाम जावळे व अॅड. आशिष मंगनानी यांनी बाजू मांडली होती. उच्च न्यायालयाने दोन्हीकडच्या बाजु एैकल्यानंतर चंद्रकांत बिराजदार यांचे स्थायी समिती सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिलेला आहे. या निकालाने काँग्रेसला धक्का बसलेला असून, आता चंद्रकांत बिराजदार यांच्या जागेवर लवकरच भाजपाच्या वतीने नवीन सदस्याची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे व मनपा भाजपाचे गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिली आहे.