धक्कादायक! पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या; अवघ्या १० महिन्यांत संसाराचा करुण अंत
KEM रुग्णालयातील डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांचे राहत्या घरी गळफास लावून आयुष्य संपवले; माहेरच्या मंडळींकडून पती अनंत गर्जेवर गंभीर आरोप
मुंबई/बीड: राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी, डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. ही घटना शनिवारी (२२ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास घडली असून, अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याच्या संसाराचा करुण अंत झाला आहे.
गौरी पालवे-गर्जे या मुंबईतील केईएम (KEM) रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांनी आत्महत्या केल्याच्या बातमीनंतर मोठी हळहळ व्यक्त होत आहे. गौरी आणि अनंत यांचा विवाह याच वर्षी ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडला होता. पंकजा मुंडे, ज्या अनंत गर्जे यांना मुलाप्रमाणे मानतात, त्या स्वतः त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह या विवाहसोहळ्याला उपस्थित होत्या. मात्र, लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यांतच गौरी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या घटनेमुळे पंकजा मुंडे यांनी त्यांचे बीडमधील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे.
🛑 मामांकडून पती अनंत गर्जेवर गंभीर आरोप:
गौरी यांच्या आत्महत्येबद्दल त्यांच्या माहेरच्या मंडळींनी संशय व्यक्त करत पती अनंत गर्जे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. गौरीचे मामा श्रीनिवास यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले, "गौरीने आत्महत्या केलेली नाही. अनंतने तिच्या वडिलांना फोन करून कट केला, त्यानंतर गौरीच्या आईला फोन करून तिने फाशी घेतल्याचे सांगितले. जर तिने फाशी घेतली तर अनंतने तिला तत्काळ रुग्णालयात न्यायला हवे होते आणि पोलिसांकडे तपासणीसाठी आमच्यासोबत यायला हवे होते, पण तो कुठेही आला नाही."
गौरीचे मामा पुढे म्हणाले, "अनंत गौरीला टॉर्चर करत होता, तिचा छळ करत होता. कारण अनंतचे अफेअर चालू असल्याची गोष्ट गौरीला समजली होती आणि याच कारणामुळे तो तिचा छळ करत होता." लग्नात गौरीच्या वडिलांनी ६० लाख रुपये खर्च केले होते. लग्नानंतर सुरुवातीचे दोन महिने वगळता, नंतर अनंतने गौरीचा छळ करायला सुरुवात केली, असा गंभीर आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.
पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर नेमके सत्य काय आहे, याचा उलगडा होईल, असे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
